Health Benefits of Black Sesame: आपल्या किचनमधील तीळ पदार्थाची टेस्ट वाढवण्यासाठी तसेच पूजेसाठी वापरले जाते. साधारणपणे काळा आणि पांढरा असे दोन प्रकारचे तीळ दिसतात. अनेक पदार्थांमध्ये पांढरे तीळ वापरले जातात. तर पूजेसाठी काळे तीळ वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का काळे तीळ तुमच्या आरोग्याचीही काळजी घेतात. कॅल्शियम, पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस्, ओमेगा-६, फायबर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारखी अनेक पोषक तत्वे काळ्या तिळात आढळतात. हे बीपी नियंत्रित करण्यास आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. काळ्या तिळाच्या सेवन केल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात ते जाणून घ्या.
हिवाळ्यात पचनाच्या समस्या खूप त्रास देतात. अशा परिस्थितीत काळ्या तिळाचे सेवन केल्याने तुमची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. काळ्या तिळामध्ये फायबर असते, जे पचनक्रिया मजबूत करते आणि पचन सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या दूर होतात.
हिवाळ्यात काळ्या तिळाचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात. काळ्या तीळामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात याचे सेवन केल्याने सांधे आणि हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. आर्थराईटिसच्या रुग्णांसाठी सुद्धा काळ्या तिळाचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते.
काळ्या तिळामध्ये व्हिटॅमिन बी ६, मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक घटक आढळतात. हे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. काळ्या तीळाचे सेवन केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते.
काळ्या तिळामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटी ऑक्सिडंट्स आढळतात. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
हिवाळ्यात काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. काळ्या तिळामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी-खोकल्यासारखे मौसमी आजार आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)