Egg Paratha Roll Recipe: मुलांना संध्याकाळच्या वेळी भूक लागते तेव्हा काहीतरी चटपटीत खायला हवे असते. अशा वेळी त्यांना रोज फास्ट फूड खायला देण्याऐवजी काहीतरी हेल्दी खायला द्यावे असे प्रत्येक आईला वाटत असते. तुम्ही सुद्धा मुलांना हेल्दी आणि टेस्टी काय खायला द्यावे हा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. एग पराठा रोल हे टेस्ट मध्ये जेवढे चांगले आहे तेवढेच ते आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. विशेष म्हणजे एग पराठा रोलची रेसिपी खूप सोपी आहे आणि ते झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या कसा बनवायचा एग पराठा रोल.
- २ वाट्या गव्हाचे पीठ
- १ कप पाणी
- २ अंडी
- २ चमचे दही
- १/२ टीस्पून आले लसूण पेस्ट
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ टीस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून धने पावडर
- १/२ टीस्पून हळद
- १/२ टीस्पून जिरे पावडर
- १/२ टीस्पून गरम मसाला
- १ चमचा लिंबाचा रस
- काळी मिरी
- मेयोनीज
- टोमॅटो सॉस
- देशी तूप
- तेल
- मीठ चवीनुसार
टेस्टी आणि हेल्दी एग पराठा रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम अंडी फोडून एका भांड्यात काढा. नंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. तसेच काळी मिरी आणि लाल तिखट घाला. बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. आता पॅन गरम करून त्यात तेल घाला. त्यावर अंडी घालून ऑम्लेट तयार करा. ऑम्लेट तयार झाल्यावर पराठा तयार करा. पराठा बनवण्यासाठी गव्हाचे पीठ मळून त्याची पोळी लाटून घ्या. आता या पोळीवर चिमूटभर मीठ आणि मिरी पावडर घाला. एका चमच्यात देशी तूप घेऊन पोळीला लावून फोल्ड करा. नंतर चमच्याने थोडं तूप लावून पुन्हा दुमडून त्रिकोणी आकार द्या. हलक्या हातांनी लाटून घ्या. तव्यावर ठेवा आणि तेल लावून भाजून घ्या. तुम्ही यासाठी रात्रीची किंवा दुपारची पोळी सुद्धा वापरू शकता.
आता तयार केलेल्या पोळीवर मेयोनीज लावा. सोबत टोमॅटो सॉस लावा. पराठ्यावर ऑम्लेट ठेवून रोल करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या रोलच्या मध्यभागी चिकन किंवा पनीरचे तुकडे किंवा विविध भाज्यांचे स्टफिंग करू शकता. तुमचा एग पराठा रोल तयार आहे. मुलांना गरमा गरम खायला द्या.
संबंधित बातम्या