Green Chilli Pickle Recipe: जेवणासोबत सर्व्ह केलेले लोणचे, चटणी जेवणाची चव दुप्पट करतात. कैरी, लिंबू, आवळा, मिरची, असे कितीतरी प्रकारचे विविध तिखट- गोड लोणचे घरी बनवले जातात. तुम्हाला सुद्धा रोज जेवणात लोणचे खायला आवडत असेल आणि नेहमीचं कैरीचं किंवा लिंबूचं लोणचं खायचं नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचे लोणचे ट्राय करू शकता. हिरव्या मिरचीच्या लोणच्याची रेसिपी खूप सोपी आहे आणि घरी लवकर बनवता येते. ज्या लोकांना स्पायसी खायला आवडते त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. चला तर मग जाणून घ्या हिरव्या मिरचीचे लोणचे कसे बनवायचे.
- हिरवी मिरची
- मोहरीचे तेल
- बडीशेप
- धणे
- ओवा
- मेथी
- कलौंजी
- मोहरी
- हळद
- हिंग
- मीठ
हिरव्या मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी प्रथम हिरव्या मिरच्या नीट धुवून आणि पुसून घ्या. मिरच्यांवर पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. नंतर मिरच्या मधोमध कापून काही वेळ उन्हात वाळवायला ठेवा. या दरम्यान लोणच्याचा मसाला तयार करा. यासाठी प्रथम बडीशेप, धणे, ओवा आणि मोहरी कोरडी भाजून घ्या आणि नंतर हे बारीक करा. आता एका भांड्यात मिरच्या काढा आणि त्यात बारीक केलेले मसाले घाला. आता त्यात मीठ, हळद आणि हिंग सोबत मेथी, कलौंजी टाका. हे सर्व नीट मिक्स करा. आता त्यात मोहरीचे तेल घाला. हे सर्व चांगले मिक्स करून घ्या.
आता हे लोणचे एखाद्या बरणीत काढा आणि नंतर काही वेळ उन्हात ठेवा. तुम्ही हे लोणचे ऊन किती कडक आहे याचा विचार करून १ ते २ दिवस उन्हात ठेवू शकता. तुमचे हिरव्या मिरचीचे लोणचे तयार आहे. जेवणासोबत सर्व्ह करा.