Fertility Problem: या ५ कारणांमुळे महिलांना होते फर्टिलिटीची समस्या, जाणून घ्या तज्ञांकडून
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fertility Problem: या ५ कारणांमुळे महिलांना होते फर्टिलिटीची समस्या, जाणून घ्या तज्ञांकडून

Fertility Problem: या ५ कारणांमुळे महिलांना होते फर्टिलिटीची समस्या, जाणून घ्या तज्ञांकडून

Published Sep 14, 2023 11:45 PM IST

Causes of Fertility Problems: अनेक महिलांमध्ये प्रजनन क्षमतेच्या समस्या असल्याचे पाहायला मिळते. हे कशामुळे होत आहे, याचे कारणं काय आहेत याबाबत तज्ञांनी सांगितले आहे.

फर्टिलिटीच्या समस्येचे कारणं
फर्टिलिटीच्या समस्येचे कारणं (Freepik)

Reasons of Infertility: दिवसेंदिवस प्रजनन क्षमतेच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे, ज्यामुळे अनेक कपल्सना वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे. एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ असुरक्षित संभोग करूनही गर्भधारणा होऊ शकत नाही तर त्यास वंध्यत्व असे म्हटले जाते. अनेक स्त्रियांना फायब्रॉइड्स, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) इत्यादी समस्यांचे निदान होत आहे, ज्याचा वंधत्वाशी संबंध आहे. मुंबई येथील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. केकिन गाला यांनी प्रजनन क्षमतेत येणाऱ्या समस्यांचे कारण स्पष्ट केले आहेत.

महिलांमध्ये वंध्यत्वाची प्रमुख कारणे

जीवनशैलीचे घटक

जीवनशैली हे वंध्यत्वाच्या समस्येचे एक प्रमुख कारण आहे. धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन, ताणतणाव आणि वाढते वजन यासारखे घटक प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम करू शकतात. हे हार्मोनल असंतुलन, स्त्रीबीज कमी होणे इत्यादीस कारणीभूत ठरू शकते. वजन खुप कमी असणे किंवा अधिक असणे या दोन्ही प्रकारांमध्ये मासिक पाळीच्या चक्रावर दुष्पपरिणाम होतो. ज्यामुळे अनियमित मासिक पाळी आणि स्त्रीबिजांसंबंधीत समस्यांना सामोरे जावे लागते.

उशीराने होणारी गर्भधारणा

प्रजनन समस्यांना कारणीभूत असलेल्या प्रमुख घटकांपैकी एक कारण म्हणजे गर्भधारणेचे वाढलेले वय. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सारा मिशेल सांगतात की, शिक्षण, करिअर, आर्थिक स्थैर्य किंवा वयक्तिक कारणांमुळे गर्भधारणा पुढे ढकलली जाते आणि मग कपल्सचे वय वाढत जाते. वयाच्या पस्तीशीनंतर महिलांची प्रजनन क्षमता कमी होते. ज्यामुळे गर्भधारणेत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाढत्या वयात स्त्रियांमध्ये स्रीबीजाचा दर्जा आणि प्रमाण देखील कमी होत जाते, तर एंडोमेट्रिओसिस आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) सारख्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करणाऱ्या वैद्यकीय परिस्थितींचा धोका वाढतो.

गर्भाशयाचे फायब्रॉइड्स

गर्भाशयाचे फायब्रॉइड्स ही स्त्रियांमध्ये सर्वात सामान्यपणे आढळून येणारी समस्या आहे आणि वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या रुग्णांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक आहे आहे. २-३% स्त्रियांमध्ये फायब्रॉइड हे वंध्यत्वाचे एकमेव कारण असू शकते. अंदाजे ५ ते १० टक्के महिलांमध्ये गर्भाशयाचे फायब्रॉइड विकसित होतात. या गाठींचा आकार किती आहे आणि ते कोणत्या भागात आहेत यानुसार ते प्रजनन क्षमतेवर परिणाम करतील की नाही हे ठरते. गर्भाशयाच्या आत किंवा अस्तरावर असलेला ट्यूमर प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतो. गर्भाशयाच्या आकारात बदल झाल्यामुळे त्यात शुक्राणू प्रवेश करू शकत नाहीत, ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. गर्भाशयाला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. यामुळे गर्भाची गर्भाशयाच्या भिंतीला चिकटून राहण्याची, विकसित होण्याची क्षमता कमी होते.

पर्यावरणीय घटक

कीटकनाशके, रसायने आणि प्रदूषकांच्या संपर्कात येण्यासारखे पर्यावरणीय घटक प्रजनन समस्यांना कारणीभूत ठरत आहेत. आपल्या वातावरणातील विषारी द्रव्य प्रजनन क्षमतेसाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सच्या संतुलनात व्यत्यय आणू शकतात. ते अंड्याच्या गुणवत्तेवरही परिणाम करू शकतात आणि त्यांना प्रजनन विकाराचा सामना करावा लागू शकतो.

 

गर्भपातानंतरचे संक्रमण

गर्भपातानंतर उपचार न केल्यास पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज (पीआयडी) सारखे संक्रमण पसरू शकते आणि तुमच्या प्रजनन प्रणालीवर परिणाम करु शकतात, ज्यामुळे दीर्घकाळ वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते. लैंगिक संक्रमित संसर्गावर उपचार न केल्याने वंध्यत्वाची समस्या देखील उद्भवू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner