Recognition of the purity of honey: फार पूर्वीपासून मधाचा वापर प्रत्येक घरात केला जातो. धार्मिक कार्यांपासून ते आरोग्याशी संबंधित समस्यांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये मधाचा वापर केला जातो. साखरेला आरोग्यदायी पर्याय म्हणून आयुर्वेदात मधाचा सल्ला दिला जातो. परंतु तुम्ही आरोग्यासाठी उत्तम समजून जे मध खाता, तो तुमच्यासाठी साखरेपेक्षाही जास्त हानिकारक ठरू शकतो. जर मध अस्सल असेल तर त्याचे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. परंतु तेच मध भेसळयुक्त असेल तर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
आजकाल मार्केटमध्ये मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही. कारण बहुतांश गोष्टी भेसळयुक्त असतात. भेसळयुक्त वस्तूंमध्ये मधाचाही समावेश होतो. मधामध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ केलेली असते. त्यामुळे मधाचा वापर करण्यापूर्वी मध शुद्ध आहे की, नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. मधाची शुद्धता तपासायची असेल तर हे काम काही मिनिटांत करता येते. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 ट्रिक्स सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही मध खरा आहे की भेसळयुक्त हे लगेच ओळखू शकता.
मधाची शुद्धता ओळखण्यासाठी आपल्या अंगठ्यावर मधाचा एक थेंब घ्या. बोटाच्या साहाय्याने मध चिकटतो का पहा. मधाचा थेंब बोटाला चिकटला तर समजून घ्या की, तुम्ही खरेदी केलेले मध शुद्ध आहे. पण जर बोटातून सहज मध निघाला तर समजा की मध बनावट आहे.
विज्ञानानुसार मधाची घनता जास्त असते. अगदीच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, मध पाण्यासारखे कागद किंवा इतर गोष्टींना ओलसर करू शकत नाही. मधात भेसळ आहे की नाही हे याच विज्ञानाचा नियम सांगू शकतो. यासाठी एक कागद घ्या आणि त्यावर मधाचे काही थेंब टाका. मधामुळे कागद ओला होऊ लागला तर मध बनावट आहे. जर मध शुद्ध असेल तर तो कागदाला ओला न करता चिकटतो.
मध भेसळयुक्त आहे की शुद्ध हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाणी होय. एका ग्लासमध्ये पाणी भरा आणि त्यात एक चमचा मध घाला. नंतर १ मिनिट थांबा. मध पाण्यात मिसळण्याऐवजी स्थिर झाल्यास मध शुद्ध आहे. पण जर मध पाण्यावर न तरंगता पाण्यात मिसळला तर तो मध भेसळयुक्त आहे.