Home remedies to get rid of cockroaches: आजकाल घरातील झुरळांच्या वावराने सर्वजण हैराण झाले आहेत. कधी स्वयंपाकघरात तर कधी बाथरुममध्ये ही झुरळं फिरताना दिसतात. काही लोक ते दिसताच चप्पल किंवा झाडूने मारण्याचा प्रयत्न करतात, पण ते इतक्या वेगाने पळतात की ते कुठे लपले हेसुद्धा कळत नाही. पावसाळयात दिवसेंदिवस घरात त्यांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ते अन्नपदार्थ, भांडी, स्वयंपाकघरातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या वस्तू इत्यादींमध्ये प्रवेश करतात आणि संसर्ग करतात. घरात जर तुम्ही स्वच्छतेची काळजी घेतली नाही, आणि या झुरळांचा नायनाट केला नाही तर तुम्ही आणि तुमची मुले आजारी पडू शकता. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला झुरळांना पळवून लावण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
घरामध्ये सतत झुरळ होत असतील तर, काळजी करण्याची गरज नाही. झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही आतापर्यंत बाजारात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून पाहिला असेल. परंतु तरीही झुरळे परत येत असतील, तर घरगुती उपाय नक्की करून पहा. रसायने असलेल्या उत्पादनांमुळेदेखील तुमचे नुकसान होऊ शकते. मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी झुरळांना पळवून लावण्याचा अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. स्वयंपाकघरात झुरळे असतील तर ते अस्वच्छ तर असतातच शिवाय अनेक आजार पसरवतात. अशा परिस्थितीत तुम्ही हे दोन उपाय नक्की करून पाहा.
घरातून झुरळे दूर करण्यासाठी पहिला सर्वात प्रभावी उपाय म्हणजे बेकिंग सोडा होय. यामध्ये साखर घाला. या दोन्हीपैकी प्रत्येकी १ चमचा एका भांड्यात टाका आणि चांगले मिक्स करा. हे मिश्रण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात टाका. झुरळे हे खाल्ल्याबरोबर घरातून पळून जातील आणि पुन्हा कधीही दिसणार नाहीत.
झुरळांपासून मुक्त होण्याचा दुसरा सर्वोत्तम उपाय म्हणजे बोरिक पावडर. ही तीच पावडर आहे जी तुम्ही कॅरमबोर्ड खेळताना बोर्डवर वापरता. बोरिक पावडर आणि साखर समान प्रमाणात म्हणजे प्रत्येकी १ चमचा घ्या, त्यांना चांगले मिक्स करा. आता स्वयंपाकघरात ज्या ठिकाणी झुरळे दिसतात त्या ठिकाणी ठेवा. ही बोरिक पावडर झुरळ खाल्ल्याबरोबरच नष्ट होतील. पंकज भदौरिया यांनी एकदा तरी नक्की हा उपाय करून पाहण्याचा सल्ला दिला आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)