मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kidney Cancer: या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात, अशी शकतात किडनीच्या कर्करोगाची सुरुवातीची चिन्हं

Kidney Cancer: या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात, अशी शकतात किडनीच्या कर्करोगाची सुरुवातीची चिन्हं

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 28, 2024 07:26 PM IST

Kidney Cancer Awareness Month: किडनीच्या कर्करोगाची काही लक्षणे वेळीच ओळखले तर त्यावर उपचार करता येतो. ही सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घ्या.

किडनीच्या कर्करोगाची लक्षणे
किडनीच्या कर्करोगाची लक्षणे (unsplash)

Early Symptoms of Kidney Cancer: किडनी किंवा मूत्रपिंडाचा कर्करोग ज्याला रेनल सेल कार्सिनोमा देखील म्हणतात, हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो किडनीमध्ये उद्भवतो. मूत्रपिंडाच्या आत असलेल्या लहान नलिकांच्या अस्तरांमध्ये हा विकसित होतो ज्यास रेनल ट्यूब्यूल्स असे म्हणतात. कर्करोगाचा हा प्रकार त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत लक्षात येत नाही. जोपर्यंत तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत नाही तोपर्यंत त्याची लक्षणे दिसून येत नाहीत. धूम्रपान, लठ्ठपणा, तंबाखू आणि उच्च रक्तदाब यासारख्या काही कारणांमुळे मूत्रपिंडाचा कर्करोग होतो. काहींना अनुवंशिकतेमुळे मूत्रपिंडाचा कर्करोग होतो. किडनीच्या कर्करोगाच्या लक्षणांकडे लक्ष देणे आणि वेळीच उपचार घेणे ही काळाची गरज आहे. चिपळूण येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दत्तात्रय अंदुरे यांची किडनीच्या कर्करोगाची लक्षणे आणि उपचार सांगितले आहे.

मूत्रपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे

- मूत्रपिंडाचा कर्करोग ही एक गंभीर समस्या आहे जी सुरुवातीच्या टप्प्यात शोधणे अवघड असते. सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे लघवीवाटे रक्त येणे जे गुलाबी, लाल किंवा गडद तपकिरी रंगाचे असू शकते.

- शरीराच्या एका बाजूला सतत पाठदुखी किंवा अस्वस्थता असल्यास मूत्रपिंडाचा कर्करोग होऊ शकतो.

- कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय वजन कमी होणे हे देखील या आजाराचे लक्षण असू शकते. त्याचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे.

- शरीराच्या वाढत्या ऊर्जेच्या मागणीमुळे किडनीच्या कर्करोगासोबत थकवा आणि अशक्तपणाची सामान्य भावना येऊ शकते. कारण ती असामान्य पेशींशी लढण्याचा प्रयत्न करते.

- सतत ताप येणे हे देखील धोक्याचे लक्षण आहे. आणखी एक महत्त्वाची चिन्ह ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे ते म्हणजे अचानक येणारा ताप जो उपचार करुनही कायम राहतो.

- पाय आणि घोट्याला सूज येणे हे देखील मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे कारण असू शकते. कारण या रोगाच्या प्रगत टप्प्यात शरीरातील पाण्याचा निचरा होत नाही.

- एनिमिया आणि लाल रक्तपेशींची संख्या कमी होणे हे मूत्रपिंडाचा कर्करोगाचे लक्षण आहे.

- पोटात सतत दुखणे हे देखील मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि लक्षणांचे योग्य निदान करणे अत्यावश्यक आहे. कारण ही लक्षणे इतर आरोग्य समस्यांसह आढळून येऊ शकतात. निदान झाल्यावर वेळीच उपचार घ्या.

किडनीच्या कर्करोगासाठी उपचार

मूत्रपिंडाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया हा प्राथमिक उपचार पर्याय असतो. परंतु मेटास्टॅटिक रोग असलेल्यांसाठी टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपी सारख्या उपचारांची आवश्यकता असू शकते. किडनीच्या कर्करोगाविरुद्धच्या या लढाईमध्ये रुग्णांचे परिणाम सुधारण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी लवकर ओळख आणि त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. शरीर सक्रिय राखणे आणि लक्षणे आढळताच त्यावर त्वरीत वैद्यकीय मदत मिळवणे कर्करोगास प्रतिबंध करण्यास फायदेशीर ठरते. धोक्याच्या लक्षणांकडे दुल्रक्ष न करता त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग