Karmveer Bhaurao Patil Death Anniversary : कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. 'शिक्षण आणि स्वावलंबन' हा त्यांचा मंत्र होता. गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणूनच त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. गरिबांच्या मुलांना कमीत कमी पैशांमध्ये शिकता यावं यासाठी त्यांनी आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही क्रांतिकारी योजना सुरु केली. त्यामुळं आजतागायत या योजनेमुळं लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणं घेणं शक्य झालं आहे. महात्मा जोतीराव फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक समाजाचेही ते सदस्य होते. १९५९ साली त्यांना या कार्याबद्दल भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
गरिब आणि वंचितांसाठी केलं मोठं काम...
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ साली कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला होता. भाऊराव पाटलांनी लहानपणापासूनच आपलं आयुष्य हे गरिब आणि वंचितांसाठी वेचण्याचं निश्चित केलं होतं. त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांचा मोठा प्रभाव असल्यानं त्यांनी देखील गोरगरिबांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यामुळं त्यातूनच रयत शिक्षण संस्था उदयास आली. आज ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था मानली जाते.
गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी सुरु केले अल्पदरात हॉस्टेल्स...
कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरीब मुलांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी गरिब आणि वंचित वर्गातील मुलांसाठी अल्पदरात वसतीगृहाची सोय करून दिली. याशिवाय या मुलांसाठी कमवा व शिका या योजनेचीही सुरुवात केली होती.
भाऊराव पाटलांचे कार्य...
वंचित आणि गरीब मुलांना शिक्षित करण्याचा वसा घेतल्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा मोठा विस्तार केला. त्यामुळं आज ही संस्था महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिक्षणसंस्था मानली जाते. जवळपास १५ जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये या संस्थेचा विस्तार झालेला आहे. सन १९५९ साली भाऊराव पाटलांना पुणे विद्यापीठानं डी.लिट. पदवी देऊन सन्मानित केले होते. कर्मवीर भाऊराव पाटील 9 मे 1959 रोजी त्यांचे निधन झाले. ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य कायम आठवणीत राहणारे आहे.
संबंधित बातम्या