Prajakta Mali Fitness: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यानुसार प्राजक्ता सध्या आपल्या 'फुलवंती' या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. 'फुलवंती' या सिनेमाची सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे. अनेक लोक फुलवंतीबाबत चर्चा करताना दिसून येतात. या चित्रपटातली प्राजक्ताच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. आपल्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातही प्राजक्ताने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ता सतत मुलाखती देताना दिसून येत आहे. या मुलाखतींमध्ये ती विविध विषयांवर गप्पासुद्धा मारत आहे. नुकतंच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने जिम आणि फिटनेस याबाबत आपले मत मांडले आहे.
प्राजक्ता माळीला नुकतंच एका मुलाखतीत तिच्या फिटनेसबाबत विचारण्यात आलं होत. याबाबत बोलताना ती म्हणाली की, 'आपण ज्यावेळी शारीरिक आरोग्याबाबत बोलतो, त्यावेळी त्यामध्ये मानसिक आरोग्याचादेखील आवर्जून समावेश करायला हवा. कारण शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून असतात. प्राजक्ता पुढे म्हणाली की, दररोज न चुकता अर्धा तास योग आणि दहा मिनिटे प्राणायाम करते. ही माझ्या आयुष्यातील त्रिसूत्री आहे जी मी फॉलो करते. कितीही गडबड असली. कोणीही माझ्या घरी आले तरी मी त्यांना बसवून माझा हा रुटीन मी फॉलो करते''.
योगासनाबाबत प्राजक्ता म्हणजे मी अष्टांगयोग अत्यंत आवडीने करते. हा सर्व योगांपेक्षा अगदी पुढच्या लेव्हलचा योग आहे. यामध्ये आपल्याला धाप लागत नाही. पण जेव्हा आपण रनिंग, सायकलिंग किंवा जिम करतो तेव्हा आपल्याला धाप लागते. जिमबाबत प्राजक्ता 'म्हणते,मी जिम या प्रकारच्या पूर्णपणे विरोधात आहे. कारण एकतर जिममध्ये तुम्ही एसी लावून व्यायाम करता. त्याने तुमचे शरीर आतून तापते. पण एसीमुळे बाहेरून अंग थंड होते. अशावेळी शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्याची पंचाईत होते. त्यामुळे जिमचा व्यायाम योग्य नसल्याचं मला वाटतं''.
प्राजक्ता योगांचे वैशिष्ट्य सांगताना म्हणते, 'योगांची बांधणी आपल्या श्वासोच्छवासावर आधारित केलेली आहे. प्रत्येक योग आपल्या श्वासोच्छवासानुसार केले जाते. योगांमुळे फक्त बाह्य नव्हे तर अंतर्गत आतड्यांचासुद्धा व्यायाम होतो. त्यामुळे हे इतर व्यायामांपेक्षा अत्यंत फायद्याचे आहे.
अभिनेत्री पुढे म्हणते अष्टांग योग हा अत्यंत फायदेशीर योगप्रकार आहे. त्याची संपूर्ण मालिका करायला तुम्हाला तब्बल एक तास लागतो. मला सध्या ते करणे शक्य होत नाही. त्यामुळे मी केवळ पंधरा मिनिटांचा व्यायाम करते. या व्यायामातसुद्धा घाम येईपर्यंत कसे योग करायचे मला आता चांगलच माहितेय. त्यामुळे मी त्याचा पुरेपूर फायदा घेते. शिवाय मी प्रवासात असताना कारमध्ये सर्वांचे मोबाईल्स बंद करून ध्यान करते. पण कोणत्याही परिस्थितीत मी ध्यान आणि योग चुकवत नाही. आणि याचा मला प्रचंड फायदा होतो'. असे म्हणते अभिनेत्रीने योग आणि ध्यानाचे आपल्या आयुष्यातील महत्व सांगितले आहे.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
संबंधित बातम्या