Jambhul Health Benefits: ऋतूनुसार फळे खायला प्रत्येकालाच पसंत असते. ही फळे फक्त तोंडाची चव वाढवत नाहीत तर, तुमच्या आरोग्यावरसुद्धा परिणाम करत असतात. त्यातीलच एक फळ म्हणजे जांभूळ होय. उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभूळ आवर्जून खायला मिळतात. जांभळाचा हंगाम येत्या काही आठवड्यांत संपणार आहे. जांभूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जांभळाचे सेवन करून आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे मिळवू शकता. आयुर्वेदात जांभळांसोबत त्याच्या बियादेखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय मानल्या जातात. जांभळासारख्या स्वादिष्ट फळाचे रोज सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ अत्यंत फायदेशीर आहे. जांभळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स फारच कमी आहे. त्यामुळेच ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखर वेगाने वाढत नाही. म्हणूनच ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले आहे. कारण जांभूळ हे असे फळ आहे जे, रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारे चढ-उतार टाळू शकते. जांभळामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. फायबर साखरेचे शोषण कमी करते, ज्यामुळे साखरेची पातळी स्थिर राहते.
तज्ज्ञ सांगतात की, ग्रामीण भागात सर्वांच्याच शेतात मिळणाऱ्या जांभळात अँथोसायनिन्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हे घटक शरीरातील जळजळ कमी करण्यास आणि पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. हे पोषक घटक मधुमेहावरील परिणाम कमी करण्यासदेखील मदत करतात. जांभळामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी जांभळाचे सेवन फायदेशीर ठरते. वजन कमी केल्याने मधुमेह नियंत्रित करणे सोपे होते. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी जांभूळ खाणे उपयुक्त आहे.
जांभुळ मधुमेह अर्थातच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरते. परंतु जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर, त्यांनी सुरुवातीला डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शिवाय त्यांनी दिलेली औषधे वेळेवर खावी. अशाने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
औषध आणि उत्तम जीवनशैलीसोबत जांभळाचे सेवन केल्यास साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, रुग्णांनी जांभळामुळे औषधे वगळू नयेत. तर औषधांच्या जोडीने जांभूळ खावा. महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला मधुमेहासोबत इतर कोणतीही समस्या असेल तर, तुम्ही जांभुळ खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आरोग्याबाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)