Jaggery Health Benefits: गोड-गोड गूळ खायला जितका स्वादिष्ट आहे, तितकाच तो आयुर्वेदिक औषध म्हणूनही काम करतो. गूळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, हे सर्वांनाच माहित आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे गुळाचा आपल्या आहारात याचा समावेश करतात. कुणी झोपेच्या आधी दुधासोबत गुळ खातं, तर कुणी गुळाचा चहा सेवन करतं. पण, सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे सेवन केल्याने त्याचे फायदे दुप्पट होतात. रोज सकाळी गुळाचा छोटासा तुकडा खाल्ल्यास त्याचा तुमच्या आरोग्याला आश्चर्यकारक फायदा होतो. जाणून घेऊया सकाळी गुळ खाण्याचे फायदे…
गुळ पोटासाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाऊन पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होतात आणि पचनक्रिया मजबूत होते. जर कोणाला बद्धकोष्ठता किंवा अॅसिडिटीची समस्या असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने मोठा आराम मिळेल. गुळात असे काही घटक आढळतात, जे पचनसंस्था मजबूत करतात. रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने अन्न पचवणारे एंझाइम्स पोटात सक्रिय होतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या दूर होऊन पोट स्वच्छ राहते.
गुळात लोह मोठ्या प्रमाणात आढळते. रोज सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाऊन पाणी प्यायल्याने शरीरातील रक्त स्वच्छ होते आणि लोहाची कमतरता दूर होते. त्याचबरोबर गूळ खाल्ल्याने शरीरात रक्त कमी असण्याची समस्याही दूर होते. गुळामध्ये कार्बोहायड्रेट देखील आढळतात, ज्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि व्यक्ती दिवसभर खूप ऊर्जावान राहतो. जर तुम्ही दिवसभर थकत असाल, तर गूळ खाल्ल्याने ही समस्याही दूर होते.
रक्तदाबाच्या रुग्णांनीही सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाऊन त्यावर पाणी प्यावे. सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यात पोटॅशियम आणि सोडियम असते, जे शरीरातील आम्लीय घटक कमी करते आणि लाल रक्तपेशी निरोगी बनवते.
सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. गुळामध्ये व्हिटॅमिन सी, बी ६ आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. तसेच, यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. गूळ इम्युनिटी बूस्टर म्हणूनही काम करतो.
जर तुम्हीही तुमच्या वाढत्या वजनाने त्रस्त असाल, तर त्यातही गूळ तुम्हाला मदत करू शकतो. गुळात असलेले पोटॅशियम शरीराचे वजन कमी करण्याचे काम करते. सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी गूळ खाणे आणि पाणी पिणे देखील शरीराचे वाढते वजन सहज नियंत्रित करू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या