Women Health Care: सीओपीडीचा महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Women Health Care: सीओपीडीचा महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

Women Health Care: सीओपीडीचा महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

Mar 07, 2024 09:44 PM IST

International Women's Day 2024: जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. सीओपीडी (COPD)चा महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि त्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय करतात येतात ते जाणून घ्या.

जागतिक महिला दिवस - सीओपीडीचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम
जागतिक महिला दिवस - सीओपीडीचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम (Freepik)

How COPD Affects Women's Health: क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) हा फुफ्फुसाचा विकार असून यामध्ये श्वसनलिकेस सूज येते आणि वायुप्रवाहात अडथळा येतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, कफ तयार होणे, खोकला आणि छातीत घरघर अशी लक्षणे आढळून येतात. हे सामान्यत: पार्टिक्युलेट मॅटर (PM) आणि सिगारेटचा धूर या कारणांमुळे आढळून येतात. दरवर्षी ८ मार्च रोजीजागतिक महिला दिन (international women's day) साजरा केला जातो. या दिनानिमित्त सीओपीडीचा महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या. मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलच्या फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. आभा महासूर यांनी याविषयी सांगितले आहे.

सीओपीडीचा महिलांवर कसा परिणाम होतो?

महिलांना या आजाराचा अधिक धोका असतो. श्वासोच्छवासात अडचण येणे, थकवा येणे आणि अशक्तपणा अशी लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करु नये. वेळीच निदान न झाल्याने डॉक्टरांचा सल्ला घेईपर्यंत हा रोग प्रगत अवस्थेत पोहोचतो. चिंता, नैराश्य आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या सीओपीडीच्या गुंतागुंतीना महिलांना सामोरे जावे लागते. कोळसा आणि लाकडाचा वापर करून स्वयंपाक करणाऱ्या तसेच बायोमास इंधनाच्या संपर्कात आल्याने, पार्टिक्युलेट मॅटर (PM) तयार होते आणि रोगाची सुरुवात होते. तंबाखूचे सेवन देखील या स्थितीला आमंत्रण देऊ शकते. चूल, बिडी, वाफ, हुक्का आणि ई-सिगारेटचा वापर टाळा. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूचे लोक धुम्रपान करतात आणि अशा हवेत श्वास घेतल्याने सीओपीडीचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून सेकंड हॅंड स्मोकींग देखील तितकेच हानीकारक आहे. मानसिक तणाव दूर करण्यासाठी धूम्रपान करणे हा पर्याय नाही. महिलांनी त्यांच्या सर्वांगीण आरोग्याकडे लक्ष देणे आणि सीओपीड कोणतीही लक्षणे आढळून आल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कसे कराल उपचार

सीओपीडी क्रॉनिक असल्याने त्याचे उपचारही दीर्घकाळ चालतात. सूज, जळजळ कमी करण्यासाठी अँटी इंफ्लेमेटरी स्टिरॉइड्स दिली जातात. संसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैविकांची आवश्यकता असते आणि गंभीर प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रिया देखील आवश्यक असू शकते. ही परिस्थिती टाळण्यासाठी, वेळेत निदान आवश्यक आहे. रूग्णांनी लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्यायाम, निरोगी जीवनशैलीचे पालन तसेच धुम्रपानासारख्या वाईट सवयी सोडणे गरजेचे आहे.

सीओपीडीस प्रतिबंध कसे कराल?

महिलांमध्ये क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) रोखण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे धूम्रपान बंद करणे. कारण सिगारेटचा धूर हे स्त्रियांमध्ये सीओपीडीचे मुख्य कारण आहे. सेकंड हँड स्मोक किंवा पॅसिव्ह स्मोकिंग आणि पर्यावरणीय प्रदूषकांचा संपर्क कमी करून घरातील हवेची गुणवत्ता चांगली राखल्याने सीओपीडीचा धोका कमी होतो. नियमित शारीरिक हालचालींमुळे महिलांमध्ये फुफ्फुसाचे कार्य आणि एकूण श्वसन आरोग्य सुधारते. फळे आणि भाज्यांनी समृद्ध संतुलित आहाराद्वारे वजन नियंत्रित राखणे हे देखील फुफ्फुसाच्या आरोग्यास फायदेशीर ठरते.

या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करून, महिलांना त्यांच्या फुफ्फुसांच्या संरक्षणासाठी सक्रिय पावले उचलता येऊ शकतात आणि सीओपीडी विकसित होण्याची शक्यता कमी करता येऊ शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner