International Women's Day 2024: ही आहेत अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे, करू नका दुर्लक्ष-international womens day 2024 these are the symptoms of ovarian cancer never ignore ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Women's Day 2024: ही आहेत अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे, करू नका दुर्लक्ष

International Women's Day 2024: ही आहेत अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे, करू नका दुर्लक्ष

Mar 08, 2024 08:37 PM IST

Ovarian Cancer: जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये होणाऱ्या अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घ्या.

अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे
अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे (unsplash)

Symptoms of Ovarian Cancer: कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार करणे महत्त्वाचे आहे. ओव्हेरियन कॅन्सर म्हणजेच अंडाशयाचा कर्करोग हा जगभरातील महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्वात घातक कर्करोगांपैकी एक आहे. त्याची चिन्हे आणि लक्षणे वेळीच ओळखून त्वरीत उपचार करणे महत्वाचे आहे. या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ओव्हेरियन कॅन्सरविषयी जागरुकता वाढवून आणि स्त्रियांना त्यांनी दुर्लक्ष करू नये याकरिता वेळीच लक्षणे ओळखण्यासाठी साक्षर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तळेगाव येथील टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरच्या रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ज्योती मेहता यांनी याविषयी सविस्तर सांगितले आहे.

अंडाशयाचा कर्करोग समजून घ्या

ओव्हेरियन कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा अंडाशयातील पेशी वाढू लागतात आणि हळूहळू पसरतात. या प्रक्रियेमुळे कर्करोगाची गाठ तयार होते. हे कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना प्रभावित करू शकते. परंतु ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये याचे निदान केले जाते.

गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे

१. ओटीपोटात दुखणे, फुगणे किंवा सूज येणे: महिलांना ओटीपोट सतत फुगल्यासारखे वाटणे किंवा सूज येऊ शकते. आणि त्यामुळे बहुतेकदा अस्वस्थता वाटू शकते.

२. लवकर पोट भरणे: हे लक्षण सामान्यतः अंडाशयाचा कर्करोगाशी संबंधित आहे आणि भूक न लागणे किंवा लवकर तृप्त होणे अशी लक्षणे दिसून येतात.

३. ओटीपोटात दुखणे: ओटीपोटात तीव्र वेदना होतात जी मासिक पाळी किंवा पाचन समस्यांशी संबंधित नसतात. यासाठी वैद्यकिय तपासणी आवश्यक आहे

४. आतड्याच्या कार्यात बदल: अंडाशयाचा कर्करोगामुळे आतड्याच्या कार्यात बदल होऊ शकतो. जसे की बद्धकोष्ठता, अतिसार किंवा सतत शौचास जावे लागणे.

५. वारंवार लघवी होणे: स्त्रियांना सतत लघवीची भावना निर्माण होणे, विशेषतः जर ती कायम राहिली आणि मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे होत नसली तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

६. अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे: अचानक वजन कमी होणे, हे अंडाशयाच्या कर्करोगासह अंतर्निहित आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.

७. थकवा: सततचा थकवा किंवा दैनंदिन कामात व्यत्यय आणणारी कमी उर्जा ही अंडाशयाच्या कर्करोगाचा संकेत देऊ शकते.

८. पाठदुखी: अंडाशयाच्या कर्करोगामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना जाणवतात. ज्याला सौम्य पाठदुखी म्हटले जाते.

वेळीच तपासणी महत्त्वाची

अंडाशयाचा कर्करोगाची वेळीच तपासणी केल्याने उपचार परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होते आणि जगण्याचीा दर वाढतो. अंडाशयाचा कर्करोगासाठी वय आणि कौटुंबिक इतिहास यासारख्या काही घटकांवर नियंत्रण ठेवता येत नसले तरी, त्याचा धोका कमी करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करता येऊ शकते

- वजन नियंत्रणात ठेवा आणि नियमित व्यायाम करा.

- गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा, ज्यामुळे अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

- अंडाशयाचा किंवा स्तनाचा कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असल्यास अनुवांशिक समुपदेशनाचा पर्याय निवडा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने वैद्यकिय चाचणी करा.

- नियमित तपासणीस करा आणि वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या

हे लक्षात घेतले पाहिजे की ही लक्षणे वेगवेगळ्या आरोग्य समस्यांमुळे देखील उद्भवू शकतात. तुम्हाला या लक्षणांबद्दल चिंता वाटत असल्यास, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला उशीर करु नका. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच निदान आणि उपचारांची निवड करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner