Yoga Poses for Menopause: रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी स्त्रियांमध्ये होते, ज्यातून प्रत्येक स्त्रीला जावे लागते. स्त्रियांच्या वयाचा हा टप्पा आहे जेव्हा त्यांना मासिक पाळी येणे थांबते. बहुतेक स्त्रियांना ४५ ते ५० वर्षांच्या वयात रजोनिवृत्ती सुरू होते. रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होऊ लागतात. त्यामुळे तिला अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. मेनोपॉजनंतर स्त्रियांना मूड स्विंग, हॉट फ्लॅशेस, तणाव, थकवा, स्नायू दुखणे, केस गळणे, त्वचेच्या समस्या आणि वजाइनल ड्रायनेस यांसारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही तुमच्या रजोनिवृत्तीच्या प्रवासाला सुरुवात करत असाल, तर तुमचा प्रवास सोपा करण्यासाठी तुमच्या रुटीनमध्ये या दोन सोप्या योगासनांचा नक्कीच समावेश करा. हे तुम्हाला मेनोपॉजदरम्यान फिट राहण्यास मदत करतील.
सुखासन रजोनिवृत्तीच्या समस्या कमी करून मूड स्विंग आणि तणाव नियंत्रित करण्यात मदत करू शकते. हे योगासन केल्याने स्नायू तर मजबूत होतातच पण सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. सुखासन करण्यासाठी प्रथम योगा मॅटवर बसा. यानंतर तुमची पाठ सरळ ठेवा आणि तुमचे डोळे बंद करा. आता तुमचे तळवे गुडघ्यावर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. काही काळ या स्थितीत रहा. या दरम्यान, श्वासोच्छवास संथ सुरु ठेवा. यानंतर तुम्ही हळूहळू सामान्य स्थितीत येऊ शकता.
सर्वांगासन हार्मोनल बदलांमुळे होणारे मूड स्विंग कमी करून मन शांत करण्यात आणि तणाव कमी करण्यास मदत करते. यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक विकारही दूर होऊ शकतात. सर्वांगासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर पाठीवर सरळ झोपा. आता हळूहळू तुमचे पाय ९० अंशांपर्यंत वर करा. आता डोके पुढे करा आणि हनुवटी छातीजवळ ठेवा. हे करत असताना कमरेला दोन्ही बाजूंनी हातांनी आधार द्या. सुमारे ३० सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर, सामान्य स्थितीत परत या. हे आसन तुम्ही ३ वेळा करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)