International Tiger Day 2024: जगभरात आजचा दिवस म्हणजे २९ जुलै हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगभरातील नष्ट होत जाणारी प्राण्यांची प्रजाती असलेल्या वाघांच्या संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे. वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर आराखडा तयार करणे आणि व्याघ्र संवर्धनाच्या मुद्द्यांसाठी जनजागृती व समर्थन करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आजच्या ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिना’च्या निमित्ताने जाणून घेऊया भारतातील प्रसिद्ध वाघ आणि वाघिणींबद्दल...
या वाघिणीच्या गालावर माशाच्या आकाराची खूण असल्यामुळे तिला ‘मचली’ हे नाव दिले गेले होते. रणथंबोरची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मचलीने भारतात वाघांची संख्या वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिने १९९९ ते २००६ दरम्यान ११ बछड्यांना जन्म दिला आणि रणथंबोरच्या वाघांची संख्या १५वरून ५०वर नेली होती. २०१३मध्ये, सरकारने मचली वाघिणीच्या सन्मानार्थ एक स्मारक पोस्टल कव्हर आणि तिकीट जारी केले. माचलीचे २०१६मध्ये वयाच्या १९व्या वर्षी निधन झाले.
कॉलरवाली ही भारतातील एकमेव वाघीण आहे, जिने २९ बछड्यांना जन्म दिला आहे. रेडिओ कॉलर लावलेली पेंचमधील पहिली वाघीण म्हणून तिचे नाव कॉलरवाली असे ठेवण्यात आले होती. तिने अनेक बछड्यांना जन्म दिल्यामुळे तिला ‘मातरम’ (प्रिय आई) म्हणूनही ओळखले जाते.
महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यानात ‘माया’ वाघीण राज्य करते. तुम्ही जर या अभयारण्याला भेट देत असाल तर, सफारी मार्गदर्शक आणि वन अधिकारी अनेकदा तिची इतर वाघिणींशी झालेल्या संघर्षाचे किस्से सांगतात. अशा लढाया वाघांमध्ये फारच कमी होतात. या त्यांच्या अधिवास आणि जगण्याची लढाई देखील दर्शवतात.
पारो ही वाघीण २०१३-१४च्या सुमारास कॉर्बेटमध्ये प्रथम दिसली होती. पारो ही ढिकाला चौर येथील ‘थंडी मा’ नावाच्या वाघिणीची मुलगी होती. तिचा आकार लहान असूनही, तिने रामगंगा नदीच्या दोन्ही बाजूंवर आपले राज्य प्रस्थापित करून दोन बछड्यांना जन्म दिला.
दिल्ली प्राणीसंग्रहालयात जन्मलेला विजय हा सहा फुटांचा पांढरा वाघ २२ वर्षांच्या घुसखोरावर हल्ला करण्यासाठी प्रसिद्ध झाला होता. प्राणिसंग्रहालयाच्या यशस्वी प्रजनन कार्यक्रमात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने त्याची सोबती कल्पना वाघिणीसोबत ५ बछड्यांना जन्म दिला.
कान्हा उद्यानाचा राजा म्हणूनही ओळखला जाणारा ‘मुन्ना’ त्याच्या कपाळावर असलेल्या विशिष्ट पट्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता तो म्हातारा झाला असला तरी, त्यांच्या त्याच्या मारामारीच्या कथा लोकप्रिय आहेत. त्यांचा मुलगा ‘छोटा मुन्ना’ कान्हामध्ये त्यांचा वारसा पुढे नेत आहे.
प्रिन्स हा वाघ कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील सर्वाधिक छायाचित्रित आणि वर्चस्व असलेला वाघ होता. २०१७मध्ये त्याचा मृतदेह उद्यानाच्या कुंदकेरे रेंजमध्ये सापडला होता.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघडोहचे नाव ताडोबाच्या मोहुर्ली भागातील एका जलकुंभावरून ठेवण्यात आले. येडा अण्णा नावाच्या दुसऱ्या वाघाचा पराभव करून त्याने आपल्या प्रदेशावर दावा केला आहे. मे २०२२मध्ये एका मेंढपाळाची शिकार केल्यानंतर तो मृतावस्थेत आढळला होता.
‘कानकाटी’ हिला ‘विजया’ म्हणूनही ओळखले जाते. तिने बांधवगड किल्ल्यापर्यंत चोरबेहरा आणि चक्रधारा प्रदेशांवर वर्चस्व गाजवले. लक्ष्मी या अपंग वाघिणीशी तिची भीषण लढाई झाल्याने, तिचा एक डोळा फुटला होता. तिची कहाणी शिवांग मेहता यांनी त्यांच्या ‘A Decade with Tigers: Supremacy, Solitude, Stripes’ या पुस्तकात दिली आहे.
बांधवगड या उद्यानात आतापर्यंतचा सर्वात मोठा वाघ अशी ओळख मिळवणाऱ्या बामेरा या वाघाने त्याच्या आजारी वडिलांना बाजूला सारून बांधवगड राष्ट्रीय उद्यानात वर्चस्व गाजवले.
संबंधित बातम्या