How many people are educated in India: कोणत्याही देशाची समृद्धी आणि विकास हे तेथील लोक किती सुशिक्षित आहेत यावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत लोकांना साक्षरतेची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' साजरा केला जातो. भारतातही याबाबत अनेक प्रयत्न सुरू आहेत. सर्व शिक्षा अभियान हे त्याचेच एक उदाहरण आहे. कोणत्याही देशात जितके जास्त लोक शिक्षण घेतात, तितके त्या देशाचे भविष्य आणि वातावरण चांगले असते. साक्षरता हा शब्द साक्षर या शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ शिक्षित असा होतो. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा उद्देश जगभरातील लोकसंख्येला साक्षर बनविण्याच्या प्रयत्नांना प्रेरणा देणे हा आहे.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची कल्पना तेहरान, इराण येथे १९६५ मध्ये झालेल्या निरक्षरतेच्या निर्मूलनावरील शिक्षण मंत्र्यांच्या जागतिक परिषदेवेळी सुचली होती. या परिषदेने जागतिक स्तरावर साक्षरतेला चालना देण्याच्या कल्पनेला जन्म दिला. त्यानंतर, युनेस्कोने १९६६ मध्ये १४ व्या सर्वसाधारण परिषदेत ८ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' म्हणून अधिकृतपणे घोषित केला. एका वर्षानंतर, म्हणजेच ८ सप्टेंबर, १९६७ रोजी, जगाने प्रथमच हा विशेष दिवस साजरा केला.
यावर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस "बहुभाषिक शिक्षणाचा प्रसार: परस्पर समंजसपणा आणि शांततेसाठी साक्षरता" या थीम अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. ९ आणि १० सप्टेंबर २०२४ रोजी कॅमेरूनमधील याऊंडे येथे जागतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, जवळपास आठ देशांचा साक्षरता दर ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे: चाड (२६.७६%), माली (३०.७६%), दक्षिण सुडान (३४.५२%), बोत्सवाना (३६.७५%), अफगाणिस्तान (३७.२७%), नायजर ( ३७.२७%), मध्य आफ्रिकन रिपब्लिक (३७.४९%), आणि सोमालिया (३७.८०%). हे सर्व देश आफ्रिकेत आहेत. दुर्दैवाने, आफ्रिकन देशांमध्ये कमी साक्षरतेच्या दरात योगदान देणारे अनेक घटक आहेत. आफ्रिका खंडातील काही भागात गरिबीमुळे, मुलांना शाळेत जाण्याऐवजी त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी कामावर पाठवले जाते. अशाप्रकारे येथे साक्षरतेमध्ये अडथळे आणणाऱ्या अनेक गोष्टी आहेत.
२०२३ मध्ये भारताचा साक्षरता दर ७४.०४ टक्के आहे. ही जागतिक सरासरी ८६.०३ टक्के पेक्षा कमी आहे. भारतातील पुरुषांचा साक्षरता दर ८२. १४ टक्के आहे. तर महिलांचा साक्षरता दर ६५. ४६ टक्के आहे. शिवाय केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे ९६.२ टक्के साक्षरता दर आहे. मिझोराममध्ये साक्षरता दर ९१. ५८ टक्के आहे. दिल्ली, त्रिपुरा, उत्तराखंड, गोवा, हिमाचल प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि पंजाबमध्येही साक्षरता दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. तर भारतातील आंध्र प्रदेशमध्ये सर्वात कमी म्हणजेच ६७. ४ टक्के साक्षरता दर आहे. बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड आणि मध्य प्रदेशातही साक्षरता दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)