भारतीय पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला एक देश म्हणजे दक्षिण-पूर्व आशियामधला थायलंड! हा देश आपला परस्पर शेजारी आहे असे म्हणता येईल. कारण भारतानंतर म्यानमार आणि म्यानमारनंतर थायलंड. भारत-म्यानमार-थायलंड दरम्यान रस्ते वाहतूक सुरू करण्याचाही इरादा आहे. यावर तीनही देश काम करत आहेत. तसे जर झाले तर थायलंडला जाण्यासाठी आत्ता जितके पैसे लागतात त्याहून कमी पैशात जायची सुविधा निर्माण होईल.
थायलंडबद्दल आणखी व अधिकृत माहिती मिळवण्याकरता मी थायलंडचे मुंबईस्थित काऊन्सिल जनरल डोनाविट पुलसावत यांची भेट घेतली. भारत आणि थायलंडमधील सहकार्याची भावना अशा भेटींमुळे वृद्धिंगत होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी मला थायलंडविषयी बरीच माहिती दिली.
थायलंडबाबत भारतीय लोकांमधला आकर्षणाचा विषय म्हणजे बॅंकॉक आणि पटाया. मात्र, या व्यतिरिक्त थायलंडमध्ये अनेक प्रेक्षणीय गोष्टी, पर्यटन स्थळे, वास्तू आहेत. थायलंड आणि भारतातले राजकीय नाते पाहायचे झाल्यास भारतीय थायलंडबाबत अतिशय सकारात्मक आहेत असे म्हणता येईल. भारत-थायलंडमध्ये लोकसंख्येच्या मानाने खूप तफावत आहे. थायलंड भारताच्या तुलनेत छोटा देश आहे. थायलंडची लोकसंख्या केवळ ६५ दशलक्ष आहे. दरवर्षी साधारणत: १८०० दशलक्ष भारतीय थायलंडला भेट देतात. विमानाने मुंबई-थायलंड केवळ पाच तासांचा प्रवास आहे. थायलंड हा देश विविध देशामध्ये शहरांमध्ये विमानसेवा चालवतो. थाई सरकार भारतीयांना थायलंडला जाण्यासाठी ३० दिवसांचा मोफत व्हिसा देतात. तो व्हिसा लोकप्रिय आहे. तो व्हिसा मुंबईत मिळतोच शिवाय थायलंडला पोहोचल्यावरही घेता येतो.
थायलंडच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी राजधानी बॅंकॉक आणि बॅंकॉकमध्ये सगळ्यांत मोठे आकर्षण असलेली गोष्ट म्हणजे थायलंडच्या राजाचा पॅलेस. हा पॅलेस अतिशय भव्य व देखणा आहे. तसेच पाचूचे बुद्ध मंदिर. एमरल्ड बुद्ध मंदिर म्हणून ते प्रसिद्ध आहे. नॅशनल म्युझियम आहे, फ्लोटिंग मार्केट आहे. बॅंकॉकपासून साधारणत: दीडशे किलोमीटर अंतरावर पटाया नावाचे आकर्षक पर्यटन स्थळ आहे. तेथे उत्तम समुद्रकिनारे, प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यांत रोझ गार्डन या ठिकाणचा एलिफन्ट शो हा तिथल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पटायात हिऱ्यांच्या उत्पत्तीपासून हिरे कसे तयार करतात, दागिने कसे घडवतात हे एका मिनी ट्रेनमधून हिऱ्यांच्या फॅक्टरीत नेऊन पर्यटकांना दाखवले जाते. मात्र, फार थोडे लोक ते बघायला जातात. माझ्या दृष्टीने ते फार चांगले आणि मोठे आकर्षण आहे.
भारतात दरवर्षी साधारणत: एक लाख थाई पर्यटक येतात. ही संख्या भारतीयांच्या तुलनेत कमी आहे. तीस थाई कंपन्या भारतात कार्यरत आहेत. तर चाळीस भारतीय कंपन्या थायलंडमध्ये कार्यरत आहेत. दोन्ही देशांत सर्वसाधारणपणे सहकार्याचे वातावरण आहे. त्यांत आवर्जून उल्लेख करावा अशा गोष्टी म्हणजे-भारतीय थायलंडला गेल्यावर सहसा फक्त बॅंकॉक आणि पटायाला भेट देतात. परंतु थायलंडचे जुने शहर म्हणजे अयुथ्थया म्हणजे त्यांची अयोध्या! हेदेखील पाहण्यासारखे आहे. शिवाय बॅंगपाईन पॅलेस नावाचा अतिशय सुंदर राजवाडा आहे. त्या राजवाड्यातून नदी वाहते. बहुतेक भारतीयांनी ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ या नावाचा चित्रपट पाहिला असेल. ही क्वाय नदी थायलंडमध्ये आहे. त्यावरचा लाकडी ब्रिज पाहायला दरवर्षी जगभरातून हजारो पर्यटक येतात.
महायुद्धात जपान्यांनी जी हानी केली त्यात जवळपास युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियातील सहा लाख लोक मृत्यूमुखी पडले. मी स्वत: त्या ठिकाणाला भेट दिली आहे. अतिशय सुंदर परिसर असूनही या घटनेमुळे आपल्याला विचित्र व दु:ख वाटू शकते. तेथे मृतांचे म्युझियम सुद्धा आहे.त्या परिसरात भरपूर हॉटेल्स आहेत. पर्यटकांसाठी अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे चांगमई हे चांगले ठिकाण आहे. क्राॅबी आणि फुकेट आयर्लंड हे समुद्रकिनारे आहे. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे थायलंडची सर्वसाधारण उद्योग वाढ २ % आहे आणि आता २०२४मध्ये ती वाढ २-३ % च राहील असा अंदाज आहे. पर्यटन थायलंडमधला मुख्य व्यवसाय आहे. पर्यटकांना लागत असलेल्या अनेक चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या प्रयत्नात थायलंड आहे.
दरवर्षी अठरा दशलक्ष पर्यटक थायलंडला भेट देतात. त्याचप्रमाणे अनेक देशांमधले पर्यटक मोठ्या संख्येने थायलंडला भेट देतात. यांत प्रामुख्याने चायना, मलेशिया, भारत, साऊथ कोरिया या देशांचा समावेश आहे. याच वर्षीच्या जानेवारी-मेपर्यंतची आकडेवारी बघितली तर साधारणत: २,१२,४०६ मलेशियन पर्यटकांनी थायलंडला भेट दिली. २९,११,३७० इतक्या चायनातल्या पर्यटकांनी थायलंडला भेट दिली. ८,४२,५८० भारतीय पर्यटकांनी थायलंडला भेट दिली. ही आकडेवारी केवळ पाच महिन्यांतली आहे.
भारतीय बॅंकॉक आणि पटाया सोडून इतर ठिकाणांना भेटी देत नाहीत. मात्र तिथे भेट दिल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडेल. शिवाय अधिक चांगले काहीतरी पाहिल्याचे समाधानही त्यांना मिळेल. ज्याला इतिहासात रस आहे त्याला थायलंडमध्ये बघण्यासारखे खूप आहे. थायलंड बौद्धधर्मीय देश असल्यामुळे विविध बौद्ध मंदिरे येथे पाहायला मिळतात. तेथले समुद्रकिनारे आणि सोयी-सुविधा यांकरता जगभरातले पर्यटक थायलंडकडे आकर्षित होतात ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत असेल.
थायलंडच्या लोकांच्या मते थायलंड आशियन देशांचे प्रवेशद्वार आहे. ते बऱ्याच प्रमाणात खरेही आहे. कारण त्यांच्या मते थायलंडमध्ये उद्योग-धंद्याकरता लागत असलेल्या मूलभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान (डिजिटल ऍडव्हान्समेंट) उपलब्ध आहे. मोठी सप्लाय चेन आहे. आशियातल्या देशांसाठी मार्केट ऍक्सेस उपलब्ध आहे. थायलंड सरकार नेहमी उद्योग-धंद्यांना पाठिंबा देते. यामध्ये बॅंकिंग इन्सेन्टिव्ह, बॅंक बेनिफिट, आर्थिक साहाय्यता योजना या गोष्टी येतात. त्याचप्रमाणे उद्योग-धंद्याला लागणारी सुरक्षितताही थायलंडमध्ये उपलब्ध आहे. उद्योग-धंदा करणारे अनेक लोक थायलंडला पसंती देतात.
भारत-थायलंडमध्ये चांगला व्यापार आहे. २०२३ साली हा व्यापार १६४४ दशलक्ष डॉलर्स इतका झाला. थायलंडने भारतात दहा दशलक्ष डॉलर्सचा माल निर्यात केला. लोखंड, स्टीलपासून निर्माण होत असलेल्या वस्तू, तांब्याच्या वस्तू त्याचप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या मशिनरीजचे पार्ट्स, वाहने आणि त्याचे पार्ट्स थायलंड निर्यात करतो. थायलंड पॉलिमर आणि इथलिन इत्यादी गोष्टी भारतात पाठवते. ऍनिमल आणि व्हेजिटेबल फॅट्स भारतात पाठवते. थायलंडमधून विविध हिरे, खडेही भारतात आयात केले जातात. शिवाय औषधेही भारतातून थायलंडमध्ये आयात-निर्यात केली जाते. तर निरनिराळ्या तऱ्हेची खनिजे, विविध धातू, मासे इत्यादी समुद्री जीव अशा गोष्टी थायलंड भारताकडून आयात करतो. फूड प्रोसेसिंगमध्ये थायलंड नंबर वनचा मानला जातो. त्यामुळे भारत थायलंडला मोठ्या प्रमाणात फ्रोजन फूड निर्यात करतो.
थालयंडमध्ये ज्याला व्यवसाय करायचा आहे त्याला जेम्स ऍण्ड ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, लाकूड, रबर, वेस्ट पेपर या सगळ्याचा व्यापार करता येईल.
थायलंडमधील थाई फूट मसाज भारतातही अतिशय प्रसिद्ध आहे. भारतातही खूप थाई स्पाज आहेत. खूप पैसे देऊन लोक ही सुविधा घेत असतात. थाई पदार्थही अतिशय लोकप्रिय आहेत. म्यानमार या देशात जास्त सोयी नाहीत परंतु म्यानमारमध्ये माणिक ह्या रत्नांचे उत्पादन व थायलंड मध्ये ह्या रत्नांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. भारतात आल्यानंतर थाई पर्यटक बुद्ध मंदिरांना भेट देतात. भारत-थायलंडमध्ये अनेक गोष्टी सामायिक आहेत. भारतीयांनी थायलंडमध्ये हॉटेल्स काढलेली आहेत. त्यामुळे भारतीय पर्यटकांना थायलंडमध्येही भारतीय पद्धतीचे जेवण उपलब्ध होऊ शकते. पंजाबी, साऊथ इंडियन हॉटेल्स प्रसिद्ध आहेत. थायलंडमध्ये अनेक पंचतारांकित हॉटेल्स, मोठमोठे मॉल्स, अद्ययावत विमानतळे आहेत. आताही ते एक मोठा विमानतळ बांधत आहेत असे मला श्री.पुलसावत यांनी सांगितले. भारत-थायलंडमध्ये सहसा मोठे वाद होत नाहीत. थाई लोक पर्यटकांचे मित्र म्हणूनच वावरतात. ज्याला आपण टुरिस्ट फ्रेंडली म्हणतो.
हे वाचाः अद्भुत, रम्य देश.. श्रीलंका!