Independence day 2024: राष्ट्रध्वज फडकवण्यापासून ते सांभाळण्यापर्यंत काय आहेत नियम, अपमान झाल्यास मिळू शकते शिक्षा?-independence day 2024 there are various rules and regulations from hoisting the national flag to keeping it ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Independence day 2024: राष्ट्रध्वज फडकवण्यापासून ते सांभाळण्यापर्यंत काय आहेत नियम, अपमान झाल्यास मिळू शकते शिक्षा?

Independence day 2024: राष्ट्रध्वज फडकवण्यापासून ते सांभाळण्यापर्यंत काय आहेत नियम, अपमान झाल्यास मिळू शकते शिक्षा?

Aug 15, 2024 05:19 PM IST

Independence day 2024: राष्ट्रध्वज ही आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यामुळे तिरंग्याचा अपमान कुणाकडूनही होणार नाही याचे भान प्रत्येकाने राखले पाहिजे.

Rules for hoisting national flag
Rules for hoisting national flag (canva)

Rules for hoisting national flag: स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकांमध्ये तिरंग्यासोबत फोटो काढण्याची प्रचंड क्रेझ असते. शिवाय अनेक लोक आपल्या घरावर किंवा घरासमोर तिरंगा लावतात. अशा परिस्थितीत तुम्हालाही कायदेशीर अडचणीत पडायचे नसेल, तर तिरंग्याशी संबंधित काही नियम आणि कायदे जाणून घेणे गरजेचे आहे. राष्ट्रध्वज ही आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यामुळे तिरंग्याचा अपमान कुणाकडूनही होणार नाही याचे भान प्रत्येकाने राखले पाहिजे. राष्ट्रध्वज फडकवण्यापासून ते राष्ट्रध्वज संभाळण्यापर्यंत अनेक नियम आणि कायदे असतात. चुकून जर तुमच्याकडून त्या नियमांचे आणि कायद्याचे उल्लंघन झाले तर तुम्हाला कायदेशीर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे राष्ट्रध्वज वापरताना आधी त्याबाबतचे नियम आणि कायदे निश्चित माहिती करून घ्यावे.

राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियम-

-संविधानानुसार, भारतीय राष्ट्रध्वज फडकवणे/वापरणे/प्रदर्शन करणे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ आणि भारतीय ध्वज संहिता, २००२ द्वारे शासित आहे. यानुसार कोणत्याही सार्वजनिक/खाजगी संस्था किंवा शैक्षणिक संस्थेचा कोणताही सदस्य कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही प्रसंगी राष्ट्रध्वज फडकवू शकतो.

-परंतु लक्षात ठेवा की, जेव्हा राष्ट्रध्वज प्रदर्शित होईल तेव्हा भगवा रंग सर्वात वर असेल. जर कुणी ध्वज उभ्या पद्धतीने दाखवत असेल, तर राष्ट्रध्वजाच्या संदर्भात भगवा रंग उजव्या बाजूला असेल म्हणजेच समोरच्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला असेल. हे लक्षात ठेवणे फारच महत्वाचे आहे.

'या' गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा-

-भारतीय ध्वज संहितेच्या कलम २.२ नुसार कोणताही सामान्य नागरिक आपल्या घरी राष्ट्रध्वज फडकावू शकतो. तथापि, जेव्हा जेव्हा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला जातो तेव्हा तो आदराच्या स्थितीत आणि स्पष्टपणे ठेवला पाहिजे.

-ज्या वेळी राष्ट्रध्वज फडकविला जाईल, तेव्हा त्याचा पूर्ण सन्मान केला पाहिजे. ते योग्य ठिकाणी ठेवले पाहिजे. ध्वज जमिनीवर किंवा कोणत्याही अस्वच्छ ठिकाणी ठेवता कामा नये याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

-नियमांनुसार राष्ट्रध्वज काहीही गुंडाळण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी किंवा वस्तूंचे वितरण करण्यासाठी वापरता येत नाही. ध्वज फरशीला, जमिनीला किंवा पाण्यात स्पर्श करण्यास परवानगी नाही. कोणत्याही कार्यक्रमात स्पीकरचे टेबल झाकण्यासाठी किंवा स्पीकरचे व्यासपीठ झाकण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकत नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

-ध्वज संहितेनुसार, राष्ट्रध्वज एकाच खांबावर इतर ध्वज किंवा ध्वजांसह फडकता कामा नये. तसेच, खराब झालेला, चुरगळलेला, फाटलेला किंवा मळकट राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यास परवानगी नाही.

राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्यास कोणती शिक्षा?

संविधानानुसार, राष्ट्रध्वजाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद राज्यघटनेत दिली आहे. जर तुम्ही ध्वज उलटा, फाटलेला किंवा मळकट फडकावताना आढळल्यास, राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ च्या कलम २ मध्ये राष्ट्रीय ध्वज, संविधान आणि राष्ट्रगीत यासारख्या भारतीय राष्ट्रीय चिन्हांचा अपमान रोखण्याच्या उद्देशाने शिक्षेची तरतूद आहे. त्यानुसार, तब्बल ३ वर्षांपर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्हीही गोष्टी लागू होऊ शकतात. त्यामुळे ध्वजारोहण करताना सर्वांनीच विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

विभाग