World Digestive Health Day 2023: पचनसंस्था नीट नसल्यास होऊ शकते डोकेदुखी!
जागतिक पाचक आरोग्य दिन दरवर्षी २९ मे रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना पचनसंस्थेचे महत्त्व सांगणे हा आहे.
World Digestive Health Day: निरोगी राहण्यासाठी आपली पचनसंस्था नीट असणे फार महत्त्वाचे आहे. खाल्लेले अन्न नीट पचतच नसेल तर त्याचा काहीच फायदा होत नाही उलट त्याचा शरीराला त्रासच जास्त होतो. अन्नाचे सेवन केल्यानंतर ते पोटाच्या दिशेने जाण्याच्या ऐवजी उलट वर येऊ लागते व त्यामुळे अॅसिडिटी होऊन छातीत दुखू लागते तेव्हा त्या स्थितीला गॅस्ट्रोएसोफजिअल रिफ्लक्स डिजिज (GERD) असे म्हणतात. यात पोटामधील आम्ल एसोफेगसच्या (अन्न आणि द्रव तोंडाकडून पोटाकडे वाहून नेणारी नलिका) दिशेने वर येऊ लागते व त्यामुळे छातीत जळजळ सुरू होते. अती खाण्याने, जंक फूड खाल्ल्याने, मसालेदार पदार्थ खाल्लाने, मद्यपान किंवा एअरेटेड पेये इत्यादी प्यायल्याने हे होऊ शकते. तसेच रात्री जेवल्याजेवल्या भरल्यापोटी लगेच झोपणे हे सुद्धा त्यामागचे एक कारण असू शकते. रिफ्लक्सचा त्रास असलेल्या बहुतांश रुग्णांना जेवल्यानंतर छातीमध्ये जळजळ वाटते. काही वेळा अशा व्यक्ती डोकेदुखीची तक्रारही करताना दिसतात. एखाद्या व्यक्तीस गॅस्ट्रोएसोफजिअल रिफ्लक्स डिजिजची समस्या असल्यास त्याचे मूळ कारण काय आहे याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते. याबद्दल अधिक जाणून घेऊयात डिरेक्टर-गॅस्ट्रोएंटेरोलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंडचे डॉ. विपुलरॉय राठोड यांच्याकडून...
ट्रेंडिंग न्यूज
काही रक्ततपासण्या, पोटाच्या भागाचे अल्ट्रासाउंड किंवा काहीवेळा अन्ननलिका, उदर आणि छोट्या आतड्याचा डुओडेनम नामक सुरवातीचा भाग यांची स्थिती जाणून घेण्यासाठीची अप्पर GI एंडोस्कोपी करून घ्यावी लागते. गॅस्ट्रोएसोफजिअल रिफ्लक्स डिजिजच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रुग्णांना कालांतराने तब्येतीच्या गंभीर व गुंतागूंतीच्या समस्या जडण्याचा धोका असतो. यात अन्ननलिका अरुंद होणे, अल्सर्स आणि अन्ननलिकेच्या खालच्या भागामध्ये काही कॅन्सरच्या पूर्वस्थितीसारखे बदल घडवून येणे या गोष्टींचा त्यात समावेश असू शकतो.
आतड्या आणि मेंदूमधील संबंध
मेंदू आणि आतड्यांमध्ये काही महत्त्वाचे न्यूरोट्रान्स्मिटर्स असल्याचे; आपली रोगप्रतिकारशक्ती, केंद्रीय चेतासंस्था यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये संदेशांची देवाणघेवाण होत असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा यातील कोणत्याही भागामध्ये काही अडथळा निर्माण झाल्यास दुसऱ्या भागामध्येही बदल घडतो. म्हणूनच गॅस्ट्रोएसोफजिअल रिफ्लक्स डिजिजचे रुग्ण डोकेदुखीची तक्रार करताना दिसतात आणि दुसऱ्या बाजूला डोकेदुखीचा त्रास असणाऱ्यांची पोटदुखीही बळावू शकते. म्हणूनच, डोकेदुखीची समस्या असलेल्या रुग्णांमध्ये डोकेदुखी नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत रिफ्लक्सची समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. गॅस्ट्रोएसोफजिअल रिफ्लक्स डिजिजवर उपचार केल्याने रुग्णांची डोकेदुखीही बरी झाल्याचे काही पाहण्यांच्या निष्कर्षांतून दिसून आले आहे. डोकेदुखीचे प्रायमरी आणि सेकंडरी असे वर्गीकरण केले जाते व गॅस्ट्रोएसोफजिअल रिफ्लक्स डिजिज मुळे होणारी डोकेदुखी ही प्रायमरी अर्थात प्राथमिक स्वरूपाच्या डोकेदुखीमध्ये मोडते.
अॅसिड रिफ्लक्सची लक्षणे आणि प्रतिबंधाचे उपाय: रुग्णांना छातीत दुखणे, मळमळणे, वेदना किंवा गिळताना दुखणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. रिफ्लक्स टाळण्यासाठी आपण पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे:
• भरल्यापोटी झोपणे टाळा
• झोपण्याआधी तीन तास जेवण झालेले असले पाहिजे
• डाव्या कुशीवर झोपा; उजव्या बाजूवर झोपल्या पोटातील आम्ल अन्ननलिकेमध्ये वर येण्याचे प्रमाण वाढते.
• भरल्या पोटी व्यायाम करू नका
• जेवणानंतर पाय मोकळे करा
• पोट पूर्ण भरेपर्यंत जेवणे टाळा
• मसालेदार पदार्थ, जंकफूड, अल्कोहोल, कॅफिन, चॉकलेट इत्यादींचे सेवन टाळा
थोडक्यात, डोकेदुखीपासून दूर रहायचे असेल तर आपल्या आतड्यांचे आरोग्य जपायला हवे.