ICMR weight loss tips : वाढतं वजन हा हल्ली अनेकांच्या चिंतेचा विषय झाला आहे. वाढत्या वजनाची जाणीव व्हायला लागली की ते झटपट कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी मग लठ्ठपणाविरोधी औषधांचा मारा केला जातो. मात्र, तसं करणं योग्य नसल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे. वजन टप्प्याटप्प्यानं कमी करण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात समतोल आहाराची शिफारस केली आहे.
आशियाई कट-ऑफनुसार २३ ते २७.५ किलो पर्यंतच्या बीएमआय असल्यास संबंधित व्यक्ती लठ्ठ असल्याचं मानलं जातं. शहरात ३० टक्के आणि ग्रामीण भागांत १६ टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढांचं वजन अतिरिक्त असल्याचं आढळून आलं आहे. जीवनशैलीशी संबंधित आजारांना आळा घालण्यासाठी आयसीएमआरनं आपल्या मार्गदर्शक सूचना ९ मध्ये लठ्ठपणा आणि ओटीपोटाच्या लठ्ठपणाची शक्यता कमी करण्यावर विवेचन केलं आहे.
'वजन हळूहळू कमी व्हायला हवं. वजन कमी करण्यासाठी घेतला जाणारा आहार दिवसाला १००० किलोकॅलरीपेक्षा कमी नसावा आणि सर्व पोषक द्रव्ये सेवन केली पाहिजेत. दर आठवड्याला अर्धा किलो वजन कमी करणं सुरक्षित मानलं जातं. वेगानं वजन कमी करणं आणि लठ्ठपणाविरोधी औषधांचा वापर टाळला पाहिजे, असं आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.
योग्य वजन आणि कमरेचा घेर राखण्यासाठी आहारात ताज्या भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि सोयाबीनचा समावेश करावा. साखर, प्रक्रिया केलेली उत्पादनं आणि फळांचा रस हे खाद्यपदार्थ टाळावेत. नियमित शारीरिक हालचाली, वजन कमी करण्याची आसनं हा चांगला मार्ग ठरू शकतो.
> पुरेशा भाज्यांसह समतोल आहार
फायबर आणि पोषक द्रव्ये असलेलं जेवण अधिक खाण्याची इच्छा कमी करेल आणि अतिरिक्त कॅलरीची गरजही कमी करेल.
> भाज्यांवर भर द्या!
भाज्यांमध्ये कॅलरी कमी आणि जीवनसत्त्वं, खनिजं आणि फायबर जास्त असल्यानं त्या आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतात.
> भाग नियंत्रणाचा सराव करा
शरीराच्या आकाराबद्दल सावधगिरी बाळगा आणि जास्त खाणं टाळा.
> स्नॅक स्मार्ट
मूठभर शेंगदाणे, साधे दही, मसाल्यासह कापलेल्या भाज्या असे पौष्टिक पर्याय निवडा.
> पातळ मांसाची निवड करा
मांसाच्या चरबीयुक्त पदार्थांच्या तुलनेत स्किनलेस पोल्ट्री, मासे, मांसाचे पातळ तुकडे कमी कॅलरीयुक्त असल्यानं अधिक उपयुक्त ठरतात.
> निरोगी स्वयंपाक पद्धती वापरा
तळलेल्या पदार्थ्यांच्या तुलनेत ग्रिलिंग, बेकिंग, स्टीमिंग किंवा परतून घेण्यासाठी कमी तेल लागते. त्यामुळं त्या पद्धतीचे पदार्थ खा.
> साखरयुक्त ड्रिंक्स टाळा!
सोडा आणि फळांचा रस यासारख्या साखरयुक्त पेयांचं सेवन कमी करा. पाणी, हर्बल चहा किंवा साखर नसलेले ड्रिंक्स अधिक चांगले असतात.
> पदार्थावरील लेबल वाचा
एखादा खाद्यपदार्थ विकत घेताना त्यात असलेले कॅलरी, सॅच्युरेटेड फॅट्स, साखर आणि सोडियमच्या माहितीसाठी फूट पॅकेटवरील लेबल तपासा. आरोग्यदायी घटक असलेले पदार्थ निवडा.
संबंधित बातम्या