Ways to Use Tea Leaves Water for Hair: केसांशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास लोक प्रथम हेअर केअर रुटीनमध्ये बदल करतात. उन्हाळ्यात केसांची सर्वात सामान्य समस्या म्हणजे कोरडे आणि निर्जीव केस. या ऋतूत केस खूप फ्रिजी होतात. त्यामुळे महागडे हेअर ट्रीटमेंट घेण्याऐवजी घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करावा. चहापत्तीचे पाणी हे त्यापैकीच एक आहे. केसांची चमक वाढवण्यासाठी हे पाणी खूप फायदेशीर आहे. यासोबतच हे पाणी कंडिशनरसारखे काम करते. ते चहापत्तीचे पाणी कसे बनवायाचे आणि वापरायचे ते पाहा.
- हेअर कलर ब्रशच्या मदतीने तुम्ही चहापत्तीचे पाणी केसांना लावू शकता. हे लावल्यानंतर एक तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने केस काळे राहू शकतात.
- केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी चहापत्तीच्या पाण्याचा कंडिशनर म्हणून वापर करा. त्यासाठी चहापत्तीच्या पाण्यात एलोवेरा जेल मिसळून केसांना लावा. थोडा वेळ तसेच राहू द्या आणि नंतर केस पाण्याने धुवा.
- तुम्ही चहापत्तीच्या पाण्याने हेअर स्प्रे बनवू शकता. ते तुमच्या स्वच्छ टाळूवर स्प्रे करा आणि ४५ मिनिटे तसंच राहू द्या. हे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि केस गळण्यास प्रतिबंध करते.
चहापत्तीचे पाणी सहज तयार करता येते. यासाठी एका भांड्यात एक लिटर पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे चहापत्ती घाला. नंतर हे पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि पाणी थंड होऊ द्या. नंतर ते गाळून वापरा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या