How to Maintain Jewelry: महागड्या नेकलेस आणि लक्झरी स्टेटमेंट रिंग्सवर हजारो खर्च पण हे दागिने योग्यरीत्या न ठेवल्यास ते खराब होतात. याचमुळे त्याची विशेष काळजी घ्यावी. सध्या जसजसे तापमान वाढते आणि दिवस मोठे होतात, तसतसे उन्हाळा वाढत जातो. या उन्हाळ्यामध्ये आपल्या मौल्यवान दागिन्यांची चमक मेंटेन करणे एक आव्हान आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या दागिन्यांच्या काळजी कशी घ्यावी याबाबदल लागू बंधूचे संचालक, पराग लागू यांच्याकडुन काही टिप्स जाणून घ्या.
घाम, सनस्क्रीन आणि बाहेरील काजळी यांचे मिश्रण तुमच्या दागिन्यांची चमक कमी करू शकते. प्रत्येक परिधानानंतर तुमचे दागिने मऊ, लिंट-फ्री कापडाने हळूवारपणे पुसणे हा नित्यक्रम बनवा. डीप स्वच्छतेसाठी, कोमट पाण्यात सौम्य साबणाचे काही थेंब घालून त्यात भिजवून काढा ,नंतर मऊ टूथब्रश वापरा आणि घाण साफ करा. तुमचे दागिने कपाटात किंवा तिजोरीत स्टोअर करून ठेवण्यापूर्वी ते पूर्णपणे कोरडे केल्याची खात्री करा.
तुमच्या दागिन्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य स्टोरेज ही गुरुकिल्ली आहे. तुमचे दागिने थंड, कोरड्या जागी थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा, जे कालांतराने रत्ने फिकट होऊ शकतात. वैयक्तिक मऊ कापडाचे पाऊच किंवा कप्प्यांसह असलेला दागिन्यांचा बॉक्स स्क्रॅच आणि गुंता टाळण्यासाठी बेस्ट आहे, विशेषत: चेन आणि कानातले यांसारख्या नाजूक वस्तूंसाठी असे बॉक्स वापरा.
उन्हाळा म्हंटलं कि पूल किंवा समुद्रात पोहण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. तरणतलावातील क्लोरीन आणि समुद्रातील क्षार हे दोन्ही घटक दागिन्यांवर हानिकारक ठरू शकतात. या घटकांच्या संपर्कात आल्याने संरचनात्मक नुकसान होऊ शकते. पोहण्याआधी किंवा जास्त घाम येवू शकेल अश्या कामांमध्ये सहभागी होण्यापूर्वी तुमचे दागिने काढून टाकण्याचा सल्ला मी देतो. याव्यतिरिक्त, संभाव्य हानिकारक रसायनांशी संपर्क कमी करण्यासाठी सनस्क्रीन आणि लोशन लावून झाल्यावरच दागिने घाला.
उन्हाळ्यात, आउटडोअर ऍक्टिव्हिटी आणि खेळ मुबलक असतात, अशा वेळी आपले दागिने घरी ठेवणे चांगले. शारीरिक हालचालींमुळे तुमच्या दागिन्यांना जास्त ताण पडू शकतो, ज्यामुळे ओरखडे, तवके उडणे किंवा अगदी तुटणे देखील होऊ शकते, विशेषतः ओपल किंवा मोत्यांसारख्या मऊ दगडांमध्ये हे होते.
तेच तेच दागिने रोज परिधान केल्याने अकाली झीज होऊ शकते. म्हणून मी आवर्जून सांगेन कि तुम्ही तुमचे दागिने आलटून पालटून वापरा. हे केवळ तुमच्या दागिन्यांचे आयुष्यच वाढवत नाही तर तुम्हाला विविध लूक स्टाईल करण्याची संधी देखील देते.
वर्षातून किमान एकदा कुशल कारागिरांकडून किंवा कुठल्याही प्रसिद्ध ज्वेलरकडून तुमच्या दागिन्यांची तपासणी करणे शहाणपणाचे आहे. सैल सेटिंग्ज, कमकुवत क्लॅस्प्स किंवा नुकसानाची चिन्हे तपासण्यासाठी उन्हाळा हा चांगला काळ आहे. हे प्रतिबंधात्मक उपाय तुम्हाला मौल्यवान खडे किंवा संपूर्ण दागिन्यांच्या संभाव्य नुकसानापासून वाचवू शकते.
या सोप्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने, पारा कितीही चढला तरी काळजी न करता तुम्ही तुमच्या आवडत्या दागिन्यांचा आनंद घेऊ शकता. लक्षात ठेवा, दागिन्यांच्या काळजीची गुरुकिल्ली केवळ नियमित साफसफाई आणि काळजीपूर्वक हाताळणीमध्ये नाही तर ते कधी घालायचे आणि कधी काढायचे हे जाणून घेणे देखील आहे.
* पन्नासारखे रत्न तापमानातील बदलांना संवेदनशील असतात, त्यामुळे साबणाच्या पाण्याचे तापमान योग्य असल्याची खात्री करा, खूप गरम किंवा खूप थंड नाही.
* स्क्रॅचचा धोका टाळण्यासाठी पिवळे नीलम आणि माणिक वेगळे ठेवा.
* हिऱ्यांसाठी सर्वात प्रभावी साफसफाईची पद्धत म्हणजे त्यांना रात्रभर पाणी आणि साबणाच्या मिश्रणात भिजवून ठेवणे, त्यानंतर पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि मऊ कोरड्या कापडाने हलक्या हाताने पुसून टाका.
* घाम आणि धूळ यांच्या संपर्कामुळे मोती काळे होऊ शकतात, त्यांना नियमितपणे सौम्य साबणाने धुवा आणि क्लोरीनच्या पाण्यात बुडवणे टाळा आणि पोहताना ते घालणे टाळा.
* सोन्याचे दागिने दर दोन महिन्यातून एकदा तरी स्वच्छ केले पाहिजेत आणि स्वच्छ करताना कठोर ब्रश वापरणे टाळावे,ज्यामुळे सोने एक मऊ धातू असल्याने स्टार्च होऊ शकते.
संबंधित बातम्या