Cleaning Hack: तुमच्याही आवडत्या कपड्यांवर पडलेत हळदीचे डाग? 'या' टिप्सने चुटकीसरशी होतील गायब
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Hack: तुमच्याही आवडत्या कपड्यांवर पडलेत हळदीचे डाग? 'या' टिप्सने चुटकीसरशी होतील गायब

Cleaning Hack: तुमच्याही आवडत्या कपड्यांवर पडलेत हळदीचे डाग? 'या' टिप्सने चुटकीसरशी होतील गायब

Published Jul 27, 2024 03:48 PM IST

How To Remove Curry Stain: हळदीचे डाग पडलेल्या कपड्यांवर चुकूनही साबण किंवा डिटर्जंट वापरू नये. असे केल्यास हळदीसोबत त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन पिवळ्या डागांचे रूपांतर लाल डागांमध्ये होते.

कपड्यांवरील हळदीचे डाग कसे काढावे
कपड्यांवरील हळदीचे डाग कसे काढावे (shutterstock)

How to remove turmeric stains from clothes: स्वच्छ आणि नीटनेटक्या कपड्यांमध्ये व्यक्तीची प्रतिमा चार-चौघांत अगदी उठून दिसते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या कपड्यांबाबत सजग असते. शिवाय अनेक लोकांना पांढरे शुभ्र कपडे घालणे पसंत असते. तर काहींचा एखादा ड्रेस असा असतो जो त्याला प्रचंड आवडतो. मात्र बऱ्याचवेळा अशा आपल्या आवडत्या कपड्यांवरच काही ना काही डाग पडलेले पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात हळदीचा डाग तर लगेच उठून दिसतो. त्यामुळे अनेकजण असे कपडे नाईलाजाने फेकून देतात, किंवा घालणे बंद करतात. मात्र आता असे करण्याची अजिबात गरज नाही. कारण यावरसुद्धा तुम्ही घरच्या घरी काही सोप्या टिप्स वापरून फरक पाहू शकता. आज आपण अशाच काही घरगुती टिप्स पाहणार आहोत ज्याच्या साहाय्याने तुम्ही तुमचे कपडे पुन्हा नव्यासारखे बनवू शकता.

हळदीचे डाग पडलेल्या कपड्यांवर अजिबात करू नका ही गोष्ट

आपल्या कपड्यांवर पडलेले हळदीचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी हळदीचे डाग पडलेल्या कपड्यावर काय करून नये हे जाणून घेणे तितकेच आवश्यक आहे. हळदीचे डाग पडलेल्या कपड्यांवर चुकूनही साबण किंवा डिटर्जंट वापरू नये. असे केल्यास हळदीसोबत त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन पिवळ्या डागांचे रूपांतर लाल डागांमध्ये होते. त्यामुळे ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवा.

लिंबूचा वापराने होईल मदत

लिंबू हा एक असा फळ आहे. ज्याचा वापर स्वयंपाक घरापासून, औषधीय गोष्टींमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, ब्युटी टिप्समध्ये जवळपास सर्वत्रच केला जातो. जर तुमच्या कपड्यांवर भाजीचे किंवा हळदीचे डाग असल्यास त्या जागेवर लिंबू घासून ते साफ करा. यामुळे डाग सहज पुसट होतात. नंतर पुन्हा दोन वेळा पाण्याने धुतल्यानंतर, ते डाग पूर्णपणे नाहीसे होतात.

व्हिनेगरचा वापर

अनेक गोष्टींमध्ये व्हिनेगरचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे पांढऱ्या कपड्यांवर हळदीचा डाग असल्यास तो डाग काही वेळ व्हिनेगरमध्ये भिजवावा. असे केल्याने हळदीचे डाग निघून जातात. पण लक्षात ठेवा रंगीबेरंगी कपड्यांवर हा प्रयोग अजिबात करू नका, नाहीतर कपड्यांचा रंग फिका पडेल. त्यामुळे कपडे जुनाट दिसायला सुरुवात होईल.

ग्लिसरीनमुळे हळदीचे डाग दूर होतात

तुमच्या कपड्यांवर भाजी किंवा डाळ पडली असेल. आणि त्यातील हळदीचा पिवळा डाग राहिला असेल तर तो साफ करण्याचा उत्तम उपाय म्हणजे ग्लिसरीन वापरणे. सर्वप्रथम, ते कपडे पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर या हळदीच्या डागांवर ग्लिसरीन लावा आणि त्यानंतर डाग असलेली जागा तासभर ग्लिसरीनमध्ये राहू द्या. नंतर पाण्याच्या जोरदार प्रवाहात कापड स्वच्छ करा. हळदीच्या खुणा लवकर निघून जातील.

Whats_app_banner