
Wheat Flour Cake Recipe Without Oven and Egg: केक शिवाय ख्रिसमस अपूर्ण वाटते. त्यातही केक घरी बनवला असेल तर सणाचा आनंद आणखी वाढतो. जर तुम्हाला ख्रिससमसाठी घरी केक बनवायचा असेल तर मैद्याऐवजी गव्हाच्या पीठापासून केक बनवून पहा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बनवण्यासाठी ओव्हन किंवा अंडी देखील आवश्यक नाहीत. तुम्ही कमी वेळेत हा केक बनवू शकता. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या ओव्हन आणि अंडीशिवाय गव्हाच्या पिठापासून केक बनवण्याची सोपी रेसिपी.
- दीड कप गव्हाचे पीठ
- १ वाटी दही
- ३/४ वाटी साखर
- १/४ वाटी तेल
- ३/४ चमचा व्हॅनिला इसेन्स
- १/२ चमचा बेकिंग सोडा
- ३/४ चमचा बेकिंग पावडर
- तुमच्या आवडीचे बारीक चिरलेले ड्राय फ्रूट्स
केक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दही घ्या. यात एक चतुर्थांश वाटी तेल आणि तीन चतुर्थांश वाटी साखर टाकून नीट मिक्स करा. साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण मिक्स करा. आता यात गव्हाचे पीठ गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. त्यात तीन चतुर्थांश चमचे बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा. सर्व नीट मिक्स करा. हे बॅटर एकाच दिशेने फेटण्याची काळजी घ्या. पण जास्त फेटण्याची गरज नाही. फक्त चांगले मिक्स होईपर्यंत फेटा. बेकिंग ट्रेला बटर किंवा तेलाने चांगले ग्रीस करा. बेकिंग ट्रेमध्ये फक्त अर्ध्या भरेल एवढे पीठ टाका. एका खोल तळाच्या पॅनमध्ये थोडे पाणी भरा आणि स्टँड ठेवा. त्यावर केक टिन ठेवून झाकून ठेवा आणि मंद आचेवर सुमारे ४५ मिनिटे ठेवा. जेणेकरून केक चांगला शिजेल. निर्धारित वेळेनंतर उघडा आणि चेक करा. केक शिजला नसेल तर अजून थोडा वेळ शिजवा. केक पूर्णपणे थंड झाल्यावरच ट्रेमधून बाहेर काढा.
संबंधित बातम्या
