Tomato Bhaji Recipe: हिवाळ्यात वाटाणा, मेथी, पालक या भाज्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. या भाज्या फक्त टेस्ट नाही तर आरोग्याला अनेक फायदे सुद्धा देतात. पण या भाज्या नेहमी नेहमी खाऊन कंटाळा येऊ शकतो. तुम्हाला सुद्धा या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल आणि काही वेगळे खावेसे वाटत असेल तर तुम्ही चविष्ट टोमॅटोची भाजी करू शकता. ही भाजी खूप लवकर तयार होते. तुम्ही पोळी किंवा पराठ्यासोबत ही टेस्टी भाजी सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घ्या झटपट टोमॅटोची भाजी कशी बनवायची.
- ५ टोमॅटो
- २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- १ बारीक चिरलेला कांदा
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- २ चमचे तेल
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा हळद
- अर्धा चमचा धणे पावडर
- १ चिमूटभर हिंग
- चवीनुसार मीठ
टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी प्रथम टोमॅटो चांगले धुवून घ्या. नंतर त्याचे लहान तुकडे करा. आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि हिंग घाला. जिरे तडतडल्यावर त्यात हिरवी मिरची आणि कांदा घालून थोडा वेळ शिजवा. कांदा चांगला भाजल्यावर त्यात टोमॅटो घाला. टोमॅटो वितळल्यावर त्यात लाल तिखट, हळद, धनेपूड, मीठ घालून चांगले शिजवून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात थोडीशी साखर किंवा गूळ घालू शकता. आता कोथिंबिरीने सजवा आणि सर्व्ह करा.
संबंधित बातम्या