Methi Paratha Recipe: सकाळचा नाश्ता हेल्दी असेल तर दिवसभर त्याची एनर्जी टिकून राहते. नाश्ता टेस्टी आणि हेल्दी बनवायचा असेल तर मेथी पराठाची हे रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. मेथी पराठा बनवायला खूप सोपा तर आहेच पण थंडीत खूप छान लागतो. आरोग्यासाठी फायदेशीर असलेली ही रेसिपी तुम्ही फक्त नाश्त्यातच नाही तर मुलांसाठी किंवा ऑफिस टिफीनसाठी सुद्धा बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा टेस्टी आणि हेल्दी मेथी पराठा.
- २ कप गव्हाचे पीठ
- २ कप मेथीची पाने
- १/४ कप दही
- १/२ टीस्पून ओवा
- १ टीस्पून आल्याची पेस्ट
- १/२ टीस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून हळद
- १/४ टीस्पून जिरे पावडर
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल
टेस्टी मेथी पराठा बनवण्यासाठी प्रथम मेथी धुवून सुकवून घ्या. त्यातील पाणी नीट वाळवा. यानंतर मेथीची पाने तोडून बारीक चिरून घ्या. आता एका बाऊलमध्ये पीठ चाळून घ्या. या पराठ्यात मेथीसोबत दही वापरल्याने मेथीचा कडूपणा कमी होतो. त्यामुळे थोडेसे दही वापरावे. यानंतर गव्हाच्या पिठात हळद, लाल तिखट, जिरेपूड, ओवा, आल्याची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व नीट मिक्स करून घ्या. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यात हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता. यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पिठात २ चमचे तेल घाला. असे केल्याने पराठे मऊ आणि क्रिस्पी होतात. आता पीठ ओल्या सुती कापडाने झाकून अर्धा तास बाजूला ठेवा. काही वेळाने पीठामध्ये थोडेसे तेल घालून पुन्हा मळून त्याचे गोळे बनवा.
यानंतर मध्यम आचेवर तवा गरम करून त्यावर थोडं तेल टाकून सगळीकडे पसरवा. आता पीठ गोल लाटून त्याचे पराठे तयार करा. गरम तव्यावर पराठा टाका आणि दोन्ही बाजूने तेल लावून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. तुमचा चविष्ट मेथी पराठा तयार आहे. तुम्ही हे दही, रायता, लोणचे किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.