Methi Kadai Paneer Recipe: दुपारच्या जेवणात नेहमीची भाजी खायची इच्छा नसेल तर तुम्ही पनीर आणि मेथीची ही खास भाजी ट्राय करू शकता. पनीरची भाजी विविध प्रकारे खायला अनेकांना आवडते. तसेच हिवाळ्यात मेथीचे सुद्धा विविध पदार्थ बनवले जातात. आलू मेथी, लसूणी मेथी या भाजी तर प्रत्येक जण आवडीने खातो. पण तुम्हाला नेहमीची भाजी खायची नसेल तर तुम्ही मेथी कढई पनीरची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही भाजी तुम्ही दुपारच्या जेवणात पराठ्यासोबत सर्व्ह करू शकता. ही भाजी बनवायला सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या मेथी कढई पनीरची ही रेसिपी
- २५० ग्राम पनीर
- २ कांदे
- ४ टोमॅटो
- १ शिमला मिरची
- ५ हिरव्या मिरच्या
- २ चमचे लसूण पेस्ट
- २ टीस्पून आले पेस्ट
- कोथिंबीर
- १/२ कप फ्रेश क्रीम
- १ टीस्पून कसुरी मेथी
- २ टीस्पून लाल तिखट
- १/४ टीस्पून हळद
- १ चमचा धणे पावडर
- १ टीस्पून गरम मसाला
- ३ मोठे चमचे तूप
- मीठ चवीनुसार
ही भाजी बनवण्यासाठी प्रथम कढईत तूप गरम करा आणि त्यात चिरलेला कांदा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात टोमॅटोची पेस्ट घाला आणि ते चांगले शिजेपर्यंत शिजवा. आता या मिश्रणात आले लसूण पेस्ट टाकून मिक्स करा. नंतर लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, मीठ आणि हळद घालून सर्व मसाले चांगले परतून घ्या. यानंतर त्यात चिरलेली सिमला मिरची घाला. थोडं पाणी घालून साधारण २ मिनिटे शिजवा. आता यात पनीर आणि कसुरी मेथी घालून मध्यम आचेवर ४-५ मिनिटे शिजू द्या. तुमची मेथी कढई पनीरची भाजी तयार आहे. आता फ्रेश क्रीम, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून गार्निश करा. पराठ्यासोबत गरमा गरम भाजी सर्व्ह करा.