मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Curd Chutney: जेवणाची लज्जत वाढवते चटपटीत दह्याची चटणी, बनवण्याची पद्धत आहे खूप सोपी

Curd Chutney: जेवणाची लज्जत वाढवते चटपटीत दह्याची चटणी, बनवण्याची पद्धत आहे खूप सोपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 22, 2023 11:53 AM IST

Chutney Recipe: रोजच्या जेवणात तिखट आणि चटपटीतपणाची कमतरता असेल तर चटणी बनवू शकता. दह्यापासून बनवलेली ही मसालेदार आणि आंबट चटणी तेल आणि मसाल्याशिवाय जेवणाची चव वाढवेल, जाणून घ्या रेसिपी.

दह्याची चटणी
दह्याची चटणी

Tasty Curd Chutney Recipe: घरी रोज तेच ते भाजी, वरण, पोळी बनवत असाल आणि त्या पदार्थाची चव वाढवायची असेल तर चटणी हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे जेवणाची चव वाढते. शिवाय चटणी बनवायला सोपी आहे. चटणी तयार करून फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन ते तीन दिवस आरामात खाऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला घरच्या जेवणाची चव वाढवायची असेल तर तुम्ही राजस्थानी पद्धतीची दह्याची चटणी बनवू शकता. ही बनवायला खूप सोपी आहे. दह्याची ही चटणी कशी बनवावी जाणून घ्या.

दही चटणी बनवण्यासाठी साहित्य

- १ कप दही

- ६-७ पाकळ्या लसूण

- कांदा बारीक चिरलेला

- लोणचे मसाला पावडर

- कसुरी मेथी

- लाल तिखट

- धने पावडर

- हळद

- जिरे

- हिंग

- मीठ चवीनुसार

- तेल

दही चटणी बनवण्याची पद्धत

राजस्थानी पद्धतीने दह्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम दही चांगले फेटून घ्या. फेटल्यानंतर दह्यात एक चमचा काश्मिरी लाल मिरची टाका. सोबत धने पावडर आणि हळद घाला. चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. लसणाच्या पाकळ्या बारीक करून घ्या. आता कढईत तेल गरम करा. तेल गरम होताच त्यात जिरे टाका. तसेच मोहरी आणि हिंग टाका. बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा परतून झाल्यावर त्यात ठेचलेला लसूण टाकून चांगला परतून घ्यावा. ते भाजल्यावर त्यात दही घालून मिक्स करून भाजून घ्या. दही भाजल्यानंतर त्यात लोणच्याचा मसाला पावडर आणि कसुरी मेथी घालून मिक्स करा. तुमची चवदार दही चटणी तयार आहे, ती फ्रीजमध्ये सुमारे ५ दिवस ठेवता येते.

स्पेशल टिप्स

मसाल्यामध्ये दही घालताना लक्षात ठेवा की गॅस मंद असावा आणि दही सतत ढवळत राहा. जेणेकरून दही फुटणार नाही. दही भाजून तेल सुटेपर्यंत ढवळावे. त्यानंतरच लोणच्याचा मसाला पावडर आणि कसुरी मेथी घालून गॅस बंद करा.

WhatsApp channel

विभाग