Rava or Suji Upma Recipe: दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी योग्य ब्रेकफास्ट खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही हेल्दी नाश्ता करता तेव्हा संपूर्ण दिवस उत्साहात जातो. हेल्दी ब्रेकफास्टमध्ये ओट्स किंवा कॉर्नफ्लेक्स सारख्या गोष्टी असतीलच असे नाही. उलट काही भारतीय नाश्त्याचे पर्याय नाश्त्यासाठी हेल्दी ऑप्शन असू शकतात. असाच एक पदार्थ म्हणजे उपमा. हे सकाळच्या नाश्त्यासाठी योग्य आहे. घरी झटपट रव्याचा उपमा बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.
- २ कप रवा
- बारीक चिरलेला कांदा
- २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- १०-१५ कढीपत्ता
- १ तुकडा आले
- लिंबाचा रस
- ताजी चिरलेली कोथिंबीर
- १ टेबलस्पून उडीद डाळ
- १ टेबलस्पून चणा डाळ
- ७-८ काजू
- अर्धा टीस्पून मोहरी
- अर्धा टीस्पून जिरे
- २ चमचे तेल
- थोडे दूध
- ३ कप पाणी
- चिमूटभर हिंग
- तूप
उपमा बनवण्यासाठी प्रथम एका कढईत एक चमचा जिरे टाकून रवा भाजून घ्या. ते जळणार नाही किंवा त्याचा रंग जास्त तपकिरी होणार नाही याची काळजी घ्या. भाजल्यानंतर हा रवा स्वच्छ, कोरड्या भांड्यात किंवा प्लेटमध्ये काढून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. नंतर त्यात मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ आणि काजू घालून चांगले परतून घ्या. यानंतर त्यात कांदा, चिरलेले आले, हिरवी मिरची, हिंग आणि कढीपत्ता घाला. आता हे पण थोडे भाजून घ्या. आता त्यात थोडे दूध आणि पाणी घालून उकळू द्या. उकळी आल्यावर त्यात मीठ टाका आणि नंतर थोडा भाजलेला रवा घालायला सुरुवात करा. गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत ढवळत रहा. आता पॅनवर झाकण ठेवा आणि गॅस कमी करा.
साधारण २-३ मिनिटे असेच राहू द्या. पाणी पूर्ण सुकल्यानंतर गॅस बंद करा. नंतर लिंबाचा रस, कोथिंबीर आणि दोन चमचे तूप घाला. तुमचा टेस्टी आणि हेल्दी उपमा तयार आहे.
संबंधित बातम्या