Gobi Tikka: स्नॅक्स असो वा स्टार्टर, बेस्ट आहे तंदूरी गोबी टिक्का, सर्व जण विचारतील रेसिपी-how to make tandoori gobi tikka recipe for evening snacks or starter ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Gobi Tikka: स्नॅक्स असो वा स्टार्टर, बेस्ट आहे तंदूरी गोबी टिक्का, सर्व जण विचारतील रेसिपी

Gobi Tikka: स्नॅक्स असो वा स्टार्टर, बेस्ट आहे तंदूरी गोबी टिक्का, सर्व जण विचारतील रेसिपी

Aug 09, 2024 07:16 PM IST

Snacks or Starter Recipe: तंदूरमध्ये शिजवलेल्या पदार्थांची चव खूपच जबरदस्त असते. तुम्ही घरी स्नॅक्स किंवा स्टार्टरसाठी तंदूरी गोबी टिक्का बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

तंदूरी गोबी टिक्का
तंदूरी गोबी टिक्का (freepik)

Tandoori Gobi Tikka Recipe: तंदूरी पनीर, कोबी, बटाटा किंवा चिकन टिक्का, पदार्थ कोणताही असो तंदूरमध्ये शिजवलेल्या पदार्थांची चव खूपच जबरदस्त असते. या सर्व गोष्टी खायला इतक्या स्वादिष्ट असतात की कोणत्याही पार्टीत स्टार्टर किंवा साइड डिश म्हणून सर्व्ह करता येतात. विशेष म्हणजे ते बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. तुम्हाला सुद्धा स्नॅक्समध्ये किंवा स्टार्टरमध्ये काही नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही तंदूरी गोबी टिक्का बनवू शकता. हे बनवणे खूप सोपे आहे. शिवाय हे खायला एवढे टेस्टी आहे की प्रत्येक जण तुम्हाला याची रेसिपी विचारेल. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घ्या कसे बनवायचे तंदूरी गोबी टिक्का.

तंदूरी गोबी टिक्का बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- फ्लॉवर - १

- घट्ट दही - १ कप

- बेसन - ३ चमचे

- लाल तिखट - १/२ टीस्पून

- गरम मसाला - १ टीस्पून

- चाट मसाला - १ टीस्पून

- हळद - १/२ टीस्पून

- धने पावडर - १ चमचा

- ओवा - १/२ चमचा

- कसूरी मेथी - १ चमचा

- तेल - आवश्यकतेनुसार

- मीठ - चवीनुसार

तंदूरी गोबी टिक्का बनवण्याची पद्धत

तंदूरी गोबी टिक्का बनवण्यासाठी सर्वप्रथम फ्लॉवरच्या कळ्या चिरून घ्या. हे नीट धुवून चार ते पाच मिनिटे वाफवून घ्या. फ्लॉवर वाफवल्याने त्यात सर्व मसाल्यांचा चांगला कोट होतो. आता वाफवलेले फ्लॉवर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. या बाऊलमध्ये तेल वगळता सर्व साहित्य घाला आणि हलक्या हातांनी मिक्स करा. आता हा बाऊल झाकून अर्धा तास बाजूला ठेवा. कढईत आवश्यकतेनुसार तेल गरम करून त्यात कोबीचे तुकडे घाला. मध्यम आचेवर काही मिनिटे शिजवा. तळलेली कोबी एका बाऊलमध्ये काढून घ्या. 

कोळशाचा एक छोटा तुकडा गरम करा. कोळसा लाल झाल्यावर स्टीलच्या वाटीत ठेवा. ही वाटी तंदूरी कोबी असलेल्या बाऊलच्या मध्यभागी ठेवा. बाऊलमध्ये एक चमचा तूप घाला आणि बाऊल एक मिनिट झाकून ठेवा. असे केल्याने गोबी टिक्कामध्ये कोळशाचा सुगंध येईल. तुमची तंदूरी गोबी टिक्का तयार आहे. हिरवी चटणी किंवा सॉससोबत गरमा गरम सर्व्ह करा.

विभाग