Sandalwood Face Pack for Summer: उन्हाळ्यात शरीरातील उष्णता आणि जळजळ यामुळे आपण त्रस्त असतो. त्वचेवर एक्ने आणि मुरुम दिसू लागतात. तर या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे चंदन. शरीराला थंडावा देण्यासोबतच चंदन अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चंदनाचा फेस पॅक त्वचेवर लावल्यास पिंपल्स, मुरुमांपासून तसेच शरीरातील उष्णतेपासून आराम मिळतो. विशेष म्हणजे चंदन लहान मुलांना सुद्धा लावता येते. जाणून घ्या त्वचेवर चंदन लावण्याचे फायदे आणि त्याचा फेस पॅक कसा बनवायचा.
उन्हाळ्यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि एक्ने दिसू लागतात. चंदनाचा फेस पॅक यापासून आराम देण्यास मदत करतो. ज्या ठिकाणी मुरुम आहेत त्या ठिकाणी चंदनाची पेस्ट लावा आणि रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त धुवा. चंदनाच्या थंडाव्यामुळे त्वचेतील उष्णता शांत होते आणि सूजही कमी होते. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत असेल तर चंदन उगाळून त्यात चिमूटभर हळद आणि कापूर टाका. हे पिंपल्सवर लावा आणि राहू द्या. नंतर पाण्याने धुवा.
चंदनाच्या तेलामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात. जे त्वचेला ढिलेपणापासून वाचवते. अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असल्याने, चंदन त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. चंदनाचे तेल मध आणि अंड्यातील पिवळ बलक मिसळून लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा धुवा.
जर चंदनाचे तेल किंवा पॅक त्वचेवर लावले तर ते केवळ त्वचेवरील डाग दूर करत नाहीत तर त्वचा पूर्णपणे मऊ आणि गुळगुळीत बनते. चंदन उगाळून त्याची पेस्ट बनवा. नंतर ते कोणत्याही कॅरियर ऑइलमध्ये मिक्स करा आणि त्वचेवर लावा. हे रात्रभर राहू द्या. सकाळी ते पाण्याने स्वच्छ करा.
उन्हाळ्यात होणाऱ्या घामोळ्यापासून आराम मिळवण्यासाठी प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी चंदनाचा वापर केला जाऊ शकतो. चंदन बारीक करून आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा. या पाण्याने लहान मुले आणि मोठ्यांनी आंघोळ केल्याने घामोळ्यापासून आराम मिळतो.
चंदनाची काडी दगडावर घासून एका भांड्यात काढा. त्यानंतर त्यात दही, लिंबाचा रस आणि मध मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी हा फेस पॅक एक प्रभावी उपाय आहे. चंदन पावडर बाजारात सहज उपलब्ध आहे. पण अधिक फायद्यांसाठी ओरिजनल चंदन खरेदी करा आणि त्याची पेस्ट बनवण्यासाठी घरीच ते उगाळा. ही पेस्ट लावल्याने तुम्हाला अधिक फायदे होतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)