मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Soup Recipe: घरी मनचाऊ सूप बनवणे आहे सोपे, या रेसिपीने मिळेल रेस्टॉरंटसारखी चव

Soup Recipe: घरी मनचाऊ सूप बनवणे आहे सोपे, या रेसिपीने मिळेल रेस्टॉरंटसारखी चव

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 12, 2024 09:32 PM IST

Manchow Soup Recipe: अनेकांना मनचाऊ सूप प्यायला तर खूप आवडते पण ते घरी बनवणे टाळतात. तुम्हाला रेस्टॉरंट सारखे मनचाऊ सूप घरी बनवायचे असेल तर ही रेसिपी ट्राय करा.

मनचाऊ सूप
मनचाऊ सूप (freepik)

Restaurant Style Manchow Soup Recipe: रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर अनेक लोक सूपमध्ये फक्त मनचाऊ सूप ऑर्डर करतात. त्याची चव इतकी अप्रतिम असते की ती नेहमीच खावेसे वाटते. अनेकांना मनचाऊ सूप प्यायला तर आवडते पण घरी बनवायला टाळतात. तुम्हाला घरी मनचाऊ सूप बनवायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. याने तुम्ही घरी सहज सूप बनवू शकता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घ्या घरी मनचाऊ सूप कसे बनवायचे.

मनचाऊ सूप बनवण्यासाठी साहित्य

- बीन्स, गाजर, हिरवा कांदा, फ्लॉवर

- एक टीस्पून तेल

- एक टीस्पून बारीक चिरलेले आले

- एक टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची

- एक टीस्पून ग्रीन चिली सॉस

- दोन चमचे सोया सॉस

- चवीनुसार मीठ

- दोन चमचे कॉर्न फ्लोअर

- अर्धा चमचा काळी मिरी पावडर

- एक चमचा व्हाईट व्हिनेगर

- चार कप पाणी

- तळलेल्या नूडल्स

मनचाऊ सूप बनवण्याची पद्धत

प्रथम नूडल्स उकळून घ्या. पाणी काढून थंड होऊ द्या. आता सर्व भाज्या, गाजर, बीन्स, स्प्रिंग ओनियन, फ्लॉवर बारीक चिरून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात ब्रोकोली, मशरूम आणि बेबी कॉर्नही टाकू शकता. आता कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण घाला. तसेच बारीक चिरलेले आले आणि हिरवी मिरची घाला. लसूण तपकिरी झाल्यावर सर्व चिरलेल्या भाज्या घालून मंद आचेवर भाजून घ्या. जेणेकरून भाज्या शिजतील आणि त्याच वेळी क्रंची राहतील. आता भाज्यांवर पाणी टाकून चांगले उकळू द्या. उकळी आल्यावर त्यात सोया सॉस, चिली सॉस, व्हाईट व्हिनेगर घालून मिक्स करा. दुसऱ्या कढईत तेल टाकून गरम करा. शिजवलेल्या नूडल्सवर कॉर्न फ्लोअर शिंपडा आणि मिक्स करा. नूडल्सवर पुरेसे कॉर्नफ्लोअर ठेवा म्हणजे ते त्याला चिकटून राहावे. जर कॉर्न फ्लोअप जास्त प्रमाणात असेल तर त्याने तेल खराब होऊ शकते. आता काही नूडल्स गरम तेलात तळून घ्या आणि किचन टॉवेलवर काढा आणि तेल शोषून घेऊ द्या. 

आता उकळत असलेल्या सूपमध्ये कॉर्नफ्लोअरचा घट्ट बॅटर घाला. एक ते दोन मिनिटे उकळू द्या आणि गॅस बंद करा. आता हिरवा कांदा, तळलेल्या नूडल्सने गार्निश करून गरमा गरम सर्व्ह करा.

WhatsApp channel