Moong Dal Sandwich Recipe: मुलांना सँडविच, पास्ता, पिझ्झा असे स्नॅक्स खायला खूप आवडतात. पण नेहमी त्यांना असे स्नॅक्स देणे आरोग्यासाठी चांगले नसते. अशा वेळी जर तुम्हाला मुलांसाठी टेस्टी आणि हेल्दी स्नॅक्स बनवायचे असेल तर तुम्ही प्रथिनांनी समृद्ध मूग डाळीचे सँडविच बनवू शकता. हे सँडविच खूप टेस्टी आहेत. ही रेसिपी बनवायला खूपच सोपी असून झटपट तयार होते. तसेच हे खायला खूप टेस्टी आणि प्रथिनांसह इतर आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण आहे. चला तर मग आपल्या मुलांसाठी प्रोटीन रिच मूग सँडविच बनवण्यासाठी जाणून घ्या त्याची रेसिपी.
- एक कप हिरवी मूग डाळ (साल असलेली)
- ब्रेड
- दोन चमचे बेसन
- चवीनुसार मीठ
- जिरे
- हिंग
- हळद
- पिझ्झा सिजनिंग
- मेयोनीज
- चीज
- टोमॅटो सॉस
- देशी तूप
हे सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कप मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मूग डाळ धुवून पाण्याशिवाय नीट बारीक करून घ्यावी. आता या बारीक केलेल्या मूग डाळीत मीठ, एक ते दीड चमचे बेसन घालावे. सोबत जिरे, हिंग घाला. थोडे थोडे पाणी घाला आणि घट्ट पीठ तयार करा. आता नॉनस्टिक पॅन गॅसवर गरम करून त्याला थोडे तूप लावा आणि तयार केलेली मूगाची पेस्ट पॅनकेकप्रमाणे त्यावर पसरवा. हे नीट पसरवल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने बाजूने दाबून ठेवावे जेणेकरून तो चौकोनी आकार घेईल आणि ब्रेडसोबत ठेवायला चांगला दिसेल. दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्या. आता ब्रेड सुद्धा तव्यावर भाजून घ्या. आता ब्रेडवर टोमॅटो सॉस लावा. सोबतच चीज किसून टाका आणि वर पिझ्झा सिजनिंग शिंपडा.
हे तव्यावर ठेवल्याने चीज थोडे वितळण्यास सुरवात होईल. यावर तयार केलेला मूग पॅनकेक ठेवा. जर मूग पॅनकेक ब्रेडच्या आकारापेक्षा मोठा असेल तर तो बाजूने कापून ब्रेडसारखाच आकार द्यावा. जेणेकरून सँडविच चांगलं दिसेल. तयार आहे टेस्टी आणि हेल्दी मूग सँडविच. सॉससोबत सर्व्ह करा.