मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Matar Makhana Curry: पराठ्यासोबत अप्रतिम लागते मटर मखानाची भाजी, लंच-डिनरसाठी बेस्ट आहे रेसिपी

Matar Makhana Curry: पराठ्यासोबत अप्रतिम लागते मटर मखानाची भाजी, लंच-डिनरसाठी बेस्ट आहे रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 28, 2024 12:06 PM IST

Recipe for Lunch and Dinner: दुपारचे जेवण असो वा रात्रीचे, रोज काहीतरी वेगळं खाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हाला सुद्धा काही वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही मटर मखानाची भाजी बनवू शकता. पराठ्यासोबत टेस्टी लागते ही रेसिपी.

मटर मखानाची भाजी
मटर मखानाची भाजी (freepik)

Matar Makhana Curry Recipe: नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळी भाजी असेल तर जेवणाची मजा द्विगुणीत होते. अनेक लोकांना ग्रेव्हीच्या भाजी खायला आवडतात. काही लोकांना कांदा लसूण न घालता ग्रेव्ही बनवायची असते पण हे बनवणे त्यांना अवघड वाटते. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही फक्त टोमॅटो आणि घरात असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने चविष्ट भाजी बनवू शकता. मटर मखानाची ही भाजी तुम्ही कांदा लसूण न घालता सुद्धा बनवू शकता. लंच आणि डिनरमध्ये ही भाजी पराठ्यासोबत सर्व्ह करता येते. चला तर जाणून घ्या कशी बनवायची मटर मखाना करी

मटर मखना करी बनवण्यासाठी साहित्य

- १ कप वाटाणा

- १ कप मखाना

- १/४ कप काजू

- ३ टोमॅटो

- १ तुकडा आले

- २ हिरव्या मिरच्या

- १ टीस्पून कोथिंबीर

- १ तमालपत्र

- १ दालचिनी

- २ वेलची

- १ स्टार फूल

- १ टीस्पून कसुरी मेथी

- १ टीस्पून लाल तिखट

- १/२ टीस्पून गरम मसाला

- १/२ टीस्पून हळद

- १ टीस्पून जिरे

- २ टेबलस्पून तूप

- १ टेबलस्पून तेल

- मीठ चवीनुसार

मटर मखाना करी बनवण्याची पद्धत

मटर मखानाची भाजी बनवण्यासाठी प्रथम कढईत तूप गरम करून त्यात मखाना भाजून घ्या. मखाना भाजून झाल्यावर कढईत अजून थोडं तूप टाकून त्यात जिरे, स्टार फूल, वेलची, दालचिनी आणि तमालपत्र टाका. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेले आले घाला. त्यात टोमॅटो घालून मिक्स करा. टोमॅटोमध्ये मीठ घाला आणि वितळू द्या. ते चांगले वितळल्यावर त्यात काजू घाला. आता थोडे टोमॅटो आणि काजू काढून पेस्ट बनवा. आता कढईत उकडलेले वाटाणे टाका आणि झाकून ठेवा. वाटाणे शिजल्यानंतर त्यात टोमॅटो आणि काजूची पेस्ट घाला. थोडे पाणी घालून सर्व मसाले घाला. थोडा वेळ शिजवा आणि नंतर गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून मिक्स करा. तुमची मटर मखानाची भाजी तयार आहे. कोथिंबिरीने गार्निश करा आणि पराठ्यासोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel