Peanut Chikki: घरी सोप्या पद्धतीने बनाव शेंगदाण्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी टेस्ट-how to make market style peanut or shengdana chikki recipe at home for makar sankranti ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Peanut Chikki: घरी सोप्या पद्धतीने बनाव शेंगदाण्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी टेस्ट

Peanut Chikki: घरी सोप्या पद्धतीने बनाव शेंगदाण्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी टेस्ट

Jan 09, 2024 06:44 PM IST

Makar Sankranti 2024: तुम्हाला बाजारासारखी क्रिस्पी शेंगदाणा चिक्की घरी बनवायची असेल तर ही रेसिपी ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवता येते.

शेंगदाणा चिक्की
शेंगदाणा चिक्की (freepik)

Peanut or Shengdana Chikki Recipe: मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक लोक तिळगुळ, तिळाचे लाडू, तिळाची वडी यासोबतच शेंगदाण्याचे लाडू, शेंगदाण्याची चिक्की सुद्धा बनवतात. गुळासोबत विविध गोष्टी मिक्स करून लाडू बनवले जातात. पण शेंगदाणे आणि गुळाचे लाडूपेक्षा शेंगदाण्याची चिक्की आवडीने खाल्ली जाते. बाजारात मिळणारी क्रिस्पी शेंगदाणा चिक्की घरी बनवणे अनेक महिलांना अवघड काम वाटते. तुम्हाला सुद्धा असे वाटत असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. या मकर संक्रांतीला घरी मार्केटसारखी शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी या सीक्रेट टिप्स फॉलो करा.

शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी टिप्स

- जर तुम्हाला मार्केटसारखी शेंगदाण्याची चिक्की बनवायची असेल तर शेंगदाणे आणि गूळ यांचे प्रमाण नेहमी समान ठेवा. जर तुम्ही १०० ग्रॅम शेंगदाणे घेतले असतील तर त्यासोबत १०० ग्रॅम गूळ घ्या.

- बाजारातून चांगल्या प्रतीचा गूळ खरेदी करा. काळ्या गुळा ऐवजी चांगला पांढरा रंगाचा गुळ वापरा. जेणेकरून चिक्कीचा रंग जास्त डार्क होणार नाही आणि परफेक्ट होईल.

- शेंगदाणे कोरडे भाजल्यानंतर त्याचे साल काढून टाका. नंतर हे शेंगदाणे थोडे जाडसर बारीक करा. जेणेकरून शेंगदाण्याचे दोन ते तीन तुकडे होतील.

- गूळ वितळण्यासाठी फक्त एक चमचा देशी तूप घाला. जास्त तूप घेतल्याने गूळ मऊ होईल. गूळ पूर्णपणे वितळल्यावर दोन चमचे पाणी घालून शिजवा.

- गूळ पाण्यात थोडा वेळ शिजल्यावर एका वाटीत पाणी घेऊन त्यात गूळ घालून पाहा. पाण्यातून बाहेर काढल्यावर गूळ मऊ दिसत असेल तर याचा अर्थ तो आणखी शिजवावा लागेल.

- आता या वितळलेल्या गुळात एक चमचा बेकिंग पावडर घाला. यामुळे गुळाचा रंग पांढरा होऊन गूळ हलका होईल. थोडा वेळ मंद आचेवर शिजवल्यानंतर गूळ पुन्हा पाण्यात टाकून पाहा. जेव्हा गूळ पूर्णपणे कडक होईल आणि पाण्यातून बाहेर काढल्यावर कट-कट आवाज येऊ लागतो, तेव्हा समजून घ्या की गूळ तयार आहे.

- आता या टप्प्यावर त्यात शेंगदाणे मिक्स करा. नंतर हे मिश्रण पॉलिथिनवर काढून कुस्करून घ्या. नीट कुटून घेतल्यानंतर थोडे थंड झाल्यावर लाटण्याच्या सहाय्याने लाटून आकार द्या. नंतर चाकूने कापून घ्या. जरा थंड होऊ द्या आणि तुमची मार्केटसारखी शेंगदाणा चिक्की तयार आहे.

Whats_app_banner