Mango Kheer Recipe: बुद्ध पौर्णिमा हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी देशभरात साजरा केला जातो. यंदा बुद्ध पौर्णिमा हा सण २३ मे रोजी साजरा होणार आहे. या पवित्र सणाबाबत असे मानले जाते की या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. गौतम बुद्ध भगवान विष्णूचा नववा अवतार मानला जातो. त्यामुळेच या सणाला हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मातील लोकांसाठी विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास करण्यासोबतच लोक अनेक प्रकारचे पदार्थ बनवतात. तुम्हालाही हा दिवस खास बनवायचा असेल तर फळांचा राजा आंब्यापासून बनवलेली चविष्ट मँगो खीर ट्राय करू शकता. ही खीर बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या मँगो खीरची रेसिपी
- १ लिटर फूल क्रीम दूध
- पिकलेल्या आंब्याचा गर
- अर्धा कप बारीक तांदूळ
- अर्धा कप साखर
- बारीक चिरलेले काजू
- बारीक चिरलेले बदाम
- १ टीस्पून वेलची पावडर
आंब्याची खीर बनवण्यासाठी प्रथम गॅसवर एका मोठ्या भांड्यात दूध उकळण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी येत असताना काजू आणि बदामांचे छोटे तुकडे करून बाजूला ठेवा. दुधाला उकळी आल्यावर गॅस कमी करा. आता दुधात तांदूळ घाला आणि अधूनमधून ढवळत शिजवा. दूध चांगले घट्ट झाल्यावर आणि तांदूळ दुधात शिजल्यावर थोडे चिरलेले काजू आणि बदाम घालून मिक्स करा. खीर चांगली शिजल्यावर म्हणजेच दूध आणि तांदूळ एकत्र चांगले मिक्स झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पावडर टाकून मिक्स करा. आता आणखी ५ मिनिटे मंद आचेवर खीर शिजवा. ५ मिनिटांनंतर खीर गॅसवरून काढून थंड होण्यासाठी ठेवा. खीर थंड झाल्यावर त्यात आंब्याचा गर घालून मिक्स करा.
यानंतर खीरमध्ये आंब्याचे बारीक तुकडे घालून मिक्स करा. तुमची चविष्ट आंब्याची खीर तयार आहे. ती एका भांड्यात काढून त्यावर काजू-बदाम आणि आंब्याचे तुकड्यांनी सजवा.
संबंधित बातम्या