Kaju Masala Curry Recipe: हिवाळ्यात मेथी, पालक अशा हिरव्या भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे रोज जेवणात त्याचे विविध पदार्थ, भाज्या सुद्धा जास्त खाल्ले जाते. रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि नवीन काहीतरी वेगळी भाजी खाण्याची इच्छा होते. तुम्हाला सुद्धा नेहमीच्या भाज्या खायच्या नसतील तर तुम्ही ही स्पेशल काजू करी ट्राय करू शकता. ही भाजी बनवायला सोपी आहे आणि लवकर तयार होते. विशेष म्हणजे ही भाजी तुम्ही पोळी, पराठा आणि भातासोबतही खाऊ शकता. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची टेस्टी काजू मसाला करी.
- १ मोठा कांदा
- १/३ कप काजू ग्रेव्हीसाठी
- १/३ कप काजू मसाला पेस्ट
- १ छोटा कांदा बारीक चिरलेला
- २ टोमॅटो चिरलेले
- आले, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट
- कोथिंबीर
- दालचिनी
- तमालपत्र
- कसुरी मेथी
- लाल तिखट
- हळद
- धणे पावडर
- गरम मसाला
- जिरे
- १ चमचा देसी तूप
- तेल
- मीठ चवीनुसार
- १/३ कप पाणी
सर्वप्रथम काजू आणि कांद्याचे तुकडे उकळून घ्या. उकळल्यानंतर या दोन्ही गोष्टी पाण्यातून बाहेर काढा आणि धुवा. जेणेकरून ग्रेव्हीचा रंग पांढरा होईल. आता ग्राइंडरमध्ये कांदा आणि काजूची बारीक पेस्ट तयार करा. आता एका पॅन किंवा कढईत तूप गरम करा. यात काजू टाकून तळून घ्या आणि सोनेरी झाल्यावर बाहेर काढा. आता उरलेल्या देशी तुपात तेल घालून गरम करा. त्यात जिरे, तमालपत्र आणि दालचिनी घाला. आता आलं, लसूण पेस्ट घालून हलके परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला परता. कांदा चांगला भाजल्यानंतर लाल होऊ लागला की त्यात हळद, तिखट आणि धने पावडर, जिरे पूड टाकून भाजून घ्या. हे सर्व नीट मिक्स करा आणि ३० सेकंद भाजून घ्या.
आता त्यात थोडे पाणी टाकून मिक्स करा. आता बारीक चिरलेला टोमॅटो आणि मीठ घाला. झाकण ठेवून दोन ते पाच मिनिटे शिजवा. टोमॅटो चांगला शिजला आणि वितळला की झाकण काढून त्यात काजू आणि कांद्याची पेस्ट घाला. हे सर्व नीट मिक्स करून शिजू द्या. आता गरम मसाला आणि कसुरी मेथी घाला. नंतर तळलेले काजू घालून कोथिंबीरने गार्निश करा. तुमची काजू मसाला करी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.