Jowar Vegetable Soup Recipe: वजन कमी करण्यासाठी फायबर आणि सर्व आवश्यक खनिजांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण असे काय बनवून खावे जे हेल्दी आणि टेस्टी असण्यासोबतच वेट लॉससाठीही मदत करतील, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या सूपची रेसिपी तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. जर तुम्हाला रात्रीच्या जेवणात हेल्दी सूप खावेसे वाटत असेल, तर हे भाज्यांनी युक्त सूप लगेच बनवा. त्याची चव उत्कृष्ट आहे आणि सर्व आवश्यक पोषक तत्वे देखील मिळतील. चला तर जाणऊन घ्या ज्वारी व्हेज सूप कसे बनवावे.
- २-३ गाजर
- २ भोपळे
- ३-४ टोमॅटो
- अर्धा कप ज्वारीचे पीठ
- २-३ कांदे
- १ चमचा हिरवी मिरची, आले आणि लसूण पेस्ट
- अर्धी वाटी हिरवे वाटाणे
- पाव चमचा काळी मिरी
- एक चमचा तेल
- पुदिन्याची पाने
- चवीनुसार मीठ
हे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर, भोपळा, टोमॅटो, वाटाणे चांगले धुवून त्याचे मोठे तुकडे करून घ्या. चिरलेला भोपळा, गाजर, पुदिन्याची पाने आणि टोमॅटो कुकरमध्ये टाका आणि ३ कप पाणी घालून उकळा. भाजी शिजल्यावर पाणी काढून घ्या आणि भाज्या एका भांड्यात काढा. सर्व भाज्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात ज्वारीचे पीठ घालून मंद आचेवर भाजून घ्या. ज्वारीच्या पीठाला एक मंद वास येऊ लागला की ते पॅनमधून काढून शिजवलेल्या भाज्यांसोबत मिक्स करा. नंतर थोडे पाणी घालून बारीक करा. आता एका कढईत तेल टाकून त्यात आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या. बारीक चिरलेला कांदा देखील घाला. चांगले तपकिरी झाल्यावर त्यात मटार घाला.
भाज्याच्या पेस्टमध्ये थोडेसे पाणी घालून पातळ करा आणि कांद्याचा तडका असलेल्या कढईत घाला. चांगले मिक्स करा आणि दोन ते तीन मिनिटे शिजवा. शेवटी मीठ, काळी मिरी आणि ओरेगॅनो घालून गरमागरम सर्व्ह करा.