
Green peas Face Pack: हिवाळ्यात बाजारात मुबलत प्रमाणात ग्रीन पीस म्हणजे वाटाणा मिळतो. हा फक्त चवीला उत्तम नाही तर ते आरोग्यासाठीही अनेक फायदे देतात. हिवाळ्यात वाटाण्याचे विविध पदार्थ तयार केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का चवीची आणि आरोग्याची काळजी घेणारे हे वाटाणे तुमचे सौंदर्य वाढवण्यातही मदत करू शकतात. वाटाणे त्वचेचा रंग सुधारतात, आतून स्वच्छ करतात आणि चमकदार बनवतात. एवढंच नाही तर हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे कोरड्या पडणाऱ्या त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि ती ग्लोइंग करण्यासाठी देखील वाटाणा खूप फायदेशीर आहेत. तुम्ही घरच्या घरी वाटाण्याचा फेस पॅक बनवून त्वचेची आर्द्रता आणि चमक टिकवून ठेवू शकता. हा फेस पॅक कसा बनवायचा आणि कसा लावायचा ते जाणून घ्या.
- २ कप उकडलेले हिरवे वाटाणे
- २ चमचे चंदन पावडर
- २ चमचे दही
- २ चमचे मध
- १ चमचा हळद
- १ चमचे एलोवेरा
- अर्ध्या लिंबाचा रस
वाटाण्याचा फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम उकडलेले वाटाणे मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट एका वाटीत किंवा छोट्या बाउलमध्ये काढा. त्यात २ चमचे मध, १ चमचा हळद आणि १ चमचा एलोवेरा जेल घालून मिक्स करा. सर्व गोष्टी नीट मिक्स केल्यानंतर त्यात २ चमचे चंदन पावडर, २ चमचे दही आणि अर्धा लिंबू पिळून पुन्हा चांगले मिक्स करा. तुमचा वाटाण्याचा फेस पॅक तयार आहे.
हिरव्या वाटाण्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी तुमचा चेहरा माइल्ड क्लिंजरने स्वच्छ करा. आता हा फेस पॅक ब्रशच्या मदतीने चेहरा आणि मानेवर लावा. साधारण २० मिनिटांसाठी तसाच राहू द्या. निर्धारित वेळेनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर चांगले मॉइश्चरायझर लावा. या फेस पॅकच्या मदतीने त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन ती चमकदार होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
