Fried Modak Recipe: देशभरात १० दिवस गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. यावेळी भाविक बाप्पाला प्रसन्न करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यासाठी ते त्यांना विविध प्रकारचे प्रसाद अर्पण करतात. त्यातही मोदक आवर्जून बनवले जातात. तुम्हाला गणपती विसर्जनाच्या दिवशी कोणते मोदक बनवायचे हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही तळलेले मोदक बनवू शकता. हे मोदक बनवायला सोपे आणि खायला टेस्टी आहेत. चला तर मग बाप्पाच्या प्रसादासाठी तळलेले मोदक कसे बनवायचे ते जाणून घ्या.
- दीड कप मैदा
- दोन चमचे रवा
- एक कप किसलेले नारळ,
- अर्धा कप भाजलेला खवा
- अर्धा कप गूळ
- दोन चमचे काजू कापलेले
- दोन चमचे बदाम चिरलेले
- दोन चमचे मनुका
- अर्धा चमचा वेलची पूड
- थोडे मीठ
- तूप
सर्वप्रथम एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये दीड कप मैदा, दोन चमचे रवा आणि अर्धा चमचा मीठ घाला. चांगले मिक्स झाल्यावर त्यात दोन चमचे गरम तूप घालावे. आता ते नीट मिक्स करा. नंतर त्यात आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. कमीत कमी ५ मिनिटे मऊ होईपर्यंत मळून घ्या. पीठाला तेल लावून झाकून बाजूला ठेवावे. आता प्रथम एका मोठ्या कढईत तूप गरम करून त्यात एक कप नारळ, अर्धा कप गूळ घाला. मग गूळ वितळल्यावर त्यात भाजलेला खवा, काजू, बदाम, मनुका, वेलची पूड घालून चांगले मिक्स करा. तुमचे स्टफिंग तयार आहे. पूर्ण पणे थंड झाल्यावर बाजूला ठेवा.
आता मोदक बनवण्यासाठी पिठाचा एक छोटासा गोळा तयार करून चपटा करून घ्या. नंतर ते थोडेसे लाटून घ्या. गोल झाल्यावर त्यात स्टफिंग ठेवून सर्व बाजूला पाणी लावावे. त्याला मोदकाचा आकार द्या आणि मग बाजूला ठेवा. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या. नंतर तूप गरम करावे. आता सर्व मोदक मंद आचेवर तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. तुमचे तळलेले मोदक तयार आहे.