
Dhaba Style Chicken Curry Recipe: ख्रिसमसचा सण अवघ्या एका दिवसावर आला आहे. तो खास बनवण्यासाठी कितीतरी दिवसांपासून लोक तयारी करतात. तुमच्या घरी सुद्धा ख्रिसमस पार्टी असेल आणि तुम्ही पार्टी फूड मेनूबद्दल थोडे कंफ्यूज असाल, तर ही ढाबा स्टाईल चिकन करी तुमची समस्या सोडवू शकते. ढाबा स्टाईल चिकन करी खायला चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. ही रेसिपी तुम्ही ख्रिसमस पार्टीत रोटी, नान किंवा भातासोबत सर्व्ह करू शकता. चला तर माग जाणून घ्या ढाबा स्टाइल चिकन करी कशी बनवायची.
- १ किलो चिकनचे तुकडे
- २ टीस्पून आले लसूण पेस्ट
- २ चमचे लिंबाचा रस
- २ टीस्पून मीठ
- २ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
- १/२ टीस्पून गरम मसाला
- ६ चमचे मोहरी तेल
- २-३ लवंगा
- ५-६ काळी मिरी
- १ इंच दालचिनीची काडी
- ३-४ सुक्या लाल मिरच्या
- २ कप किसलेला कांदा
- १ टीस्पून आले चिरलेले
- १ टीस्पून चिरलेला लसूण
- १ कप किसलेले टोमॅटो
- १ कप दही (2 चमचे मैद्यासोबत फेटलेले)
- २ चमचे कसुरी मेथी
- १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
- १ टीस्पून धने पावडर
- १ टीस्पून हळद
- १/२ टीस्पून गरम मसाला
- १ टीस्पून जिरे पावडर
- चवीनुसार मीठ
चिकन करी बनवण्यासाठी प्रथम चिकन मॅरीनेट करून घ्या. त्यासाठी एका मोठ्या भांड्यात एक किलो चिकनचे तुकडे, आले लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, काश्मिरी लाल तिखट आणि गरम मसाला घालून सर्व चांगले मिक्स करा आणि बाजूला ठेवा. यानंतर चिकन करी तयार करण्यासाठी लवंगा, काळ्या मिरी आणि दालचिनीचा तुकडा एका खलबत्यात टाकून हलकेच बारीक करून घ्या आणि बाजूला ठेवा.
आता एका मोठ्या कढईत मोहरीचे तेल मोठ्या आचेवर गरम करा. त्यात ठेचलेला मसाला आणि सुक्या लाल मिरच्या घालून २-३ सेकंद तडतडू द्या. नंतर कढईत किसलेला कांदा घाला आणि मध्यम-उच्च आचेवर १० मिनिटे हलका तपकिरी होईपर्यंत भाजा. नंतर चिरलेले आले आणि चिरलेला लसूण घाला आणि तपकिरी होईपर्यंत आणखी ७ मिनिटे भाजून घ्या. आता या कढईत मॅरीनेट केलेले चिकन घाला आणि ४-५ मिनिटे मंद आचेवर शिजवा. हे करताना चिकन वारंवार ढवळत राहा. आता किसलेले टोमॅटो घाला आणि ४-५ मिनिटे शिजवा. नंतर मैद्यासोबत फेटलेले १ कप दही घालून मिक्स करा. साधारण ३-४ मिनिटे शिजू द्या. दह्यामध्ये पीठ घातल्यास ते शिजवताना फाटण्याची भिती राहत नाही.
आता त्यात धनेपूड, हळद, काश्मिरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. पॅनवर झाकण ठेवा आणि मंद आचेवर सुमारे अर्धा तास चिकन मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर त्यात गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून एक मिनिट शिजवा. जर करी खूप घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घालून आणखी उकळवा. तुमची टेस्टी ढाबा स्टाइल चिकन करी तयार आहे. तंदुरी रोटी, नान किंवा भातासोबत सर्व्ह करा.
संबंधित बातम्या
