Bhindi Masala Recipe: लंच मध्ये बनवा टेस्टी भेंडी मसाला, नोट करा ही ढाबा स्टाईल रेसिपी-how to make dhaba style bhindi masala recipe at home ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bhindi Masala Recipe: लंच मध्ये बनवा टेस्टी भेंडी मसाला, नोट करा ही ढाबा स्टाईल रेसिपी

Bhindi Masala Recipe: लंच मध्ये बनवा टेस्टी भेंडी मसाला, नोट करा ही ढाबा स्टाईल रेसिपी

Feb 06, 2024 01:02 PM IST

Recipe for Lunch: नेहमीची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ढाबा स्टाईल भेंडी मसालाची ही रेसिपी ट्राय करा. ही भाजी घरी सहज बनवता येते.

भेंडी मसाला
भेंडी मसाला (freepik)

Dhaba Style Bhindi Masala Recipe: अनेक लोकांना भेंडीची भाजी खायला खूप आवडते. पण नेहमी त्याच त्या पद्धतीने बनवलेली भाजी खाण्याचा कंटाळा येतो. तुम्हाला सुद्धा यावेळी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. भेंडीची भाजी खायला खूप चविष्ट तर आहेच पण खूप कमी वेळात तयारही होते. साधी भेंडीची भाजी बनवण्याऐवजी तुम्ही ढाबा स्टाईल भेंडी मसाल्याची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही भाजी पोळी आणि पराठ्यासोबत खूप टेस्टी लागते. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची ढाबा स्टाईल भेंडी मसाला.

ढाबा स्टाइल भेंडी मसाला बनवण्यासाठी साहित्य

- २०० ग्राम भेंडी

- २ टोमॅटो

- १ इंच आल्याचा तुकडा

- ५ ते ७ लसूण पाकळ्या

- १ टेबलस्पून भाजलेले धणे

- ४ भाजलेल्या सुक्या लाल मिरच्या

- १ चमचा भाजलेले काळी मिरी

- १ टीस्पून भाजलेले जिरे

- १/२ टीस्पून हळद

- १ टीस्पून गरम मसाला

- १/४ कप तेल

- १ टीस्पून जिरे

- २ हिरव्या मिरच्या

- १ चिरलेला कांदा

- १ टीस्पून कसुरी मेथी

- कोथिंबीर

- पाणी आवश्यकतेनुसार

- चवीनुसार मीठ

ढाबा स्टाईल भेंडी मसाला बनवण्याची पद्धत

ही भाजी बनवण्यासाठी प्रथम कढईत तेल टाका. त्यात चिरलेली भेंडी ७० ते ८० टक्के तळून घ्या आणि वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्या. यानंतर कढईत उरलेल्या तेलात जिरे, चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा घालून मऊ होईपर्यंत शिजवा. आता भेंडी मसाला तयार करण्यासाठी टोमॅटोमध्ये आले, लसूण, भाजलेले जिरे, धणे, काळी मिरी आणि लाल मिरची घालून थोडेसे पाणी घालून बारीक करा. चांगली पेस्ट तयार झाल्यावर हा मसाला कढईत टाका. यानंतर या मसाल्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला टाका. कांद्याबरोबर पॅनमध्ये हे सर्व मसाले चांगले भाजून घ्या. मसाल्यातून तेल सुटेपर्यंत शिजू द्या. यानंतर तळलेली भेंडी पॅनमध्ये घाला आणि आणखी १० मिनिटे शिजवा. यानंतर पॅनमध्ये कसुरी मेथी घालून मिक्स करा. कोथिंबीरने गार्निश करून गरमागरम पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.