Dahi Potato Sabji Recipe: लहान मुले भाजी खाण्यास टाळाटाळ करतात. तर अनेक वेळा मोठ्यांना सुद्धा नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. तुम्हाला सुद्धा दुपारच्या जेवणासाठी काहीतरी वेगळी भाजी बनवायची असेल तर तुम्ही दही बटाट्याची ही भाजी बनवू शकता. ही रेसिपी खायला जेवढी टेस्टी आहे तेवढीच बनवायला सोपी आहे. ही रेसिपी लहान मुले आणि मोठ्यांना दोघांनाही आवडेल. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची दही बटाट्याची भाजी.
- २-३ उकडलेले बटाटे
- ४-५ चमचे घट्ट दही
- एक चमचा जिरे
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- दोन चमचे तेल
- चिमूटभर हिंग
- आल्याचा बारीक तुकडा
- हळद
- लाल तिखट
- एक चमचा गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- बारीक चिरलेली कोथिंबीर
ही भाजी बनवण्यासाठी सर्व प्रथम बटाटे उकळून घ्या. आता एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे तडतडून घ्या. जिऱ्याबरोबर हिंग घाला आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. तसेच आल्याचे बारीक तुकडे घाला. आता उकडलेले बटाटे हाताने मॅश करा आणि कढईत टाका. आता यात लाल तिखट, हळद, गरम मसाला टाका आणि नीट मिक्स करा. हे मिक्स करताना गॅसची फ्लेम हाय ठेवून भाजा. जेव्हा हे थोडे भाजून सोनेरी होईल तेव्हा गॅस मंद करून पाणी घाला. तसेच चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि थोडा वेळ शिजवा. साधारण दोन मिनिटे पाणी उकळले की गॅस बंद करून दही घाला. दही घालून नीट मिक्स करा आणि पुन्हा गॅस चालू करा. ढवळत असताना उकळू द्या आणि दोन मिनिटे शिजवा.
दही आणि पाणी चांगले शिजल्यावर गॅस बंद करा आणि भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तुमची टेस्टी दही बटाट्याची भाजी तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.