Crispy Paneer Balls Recipe: नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येक जण उत्साहात करतो. यानिमित्ताने अनेक जण मित्र आणि परिवारासोबत पार्टी करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हणजे खाण्या-पिण्याची रेलचेल असते. अशा वेळी पार्टीमध्ये स्नॅक्समध्ये विविध पदार्थ ठेवले जातात. तुम्ही सुद्धा पार्टी स्नॅक्ससाठी काही शोधत असाल जे झटपट तयार होईल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही पार्टीसाठी क्रिस्पी पनीर बॉल्स बनवू शकता. हे बनवायला सोपे पण चवीच्या बाबतीत एकदम अप्रतिम आहेत. लहान मुलांपासून मोठ्यापंर्यंत हे पनीर बॉल्स सर्वांना आवडतील. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे क्रिस्पी पनीर बॉल्स.
- १०० ग्रॅम ताजे पनीर
- २ चमचे तांदळाचे पीठ
- १ चमचा बेसन
- १ चमचा कॉर्न फ्लोअर
- २ कांदे बारीक चिरून
- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- १ इंच आल्याचा तुकडा बारीक चिरलेला
- २ चमचे बारीक चिरलेले कोथिंबीर
- काळी मिरी
- ओरेगॅनो
- चिली फ्लेक्स
- मीठ चवीनुसार
हे स्नॅक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीर चांगले मॅश करा. यासाठी तुम्ही किसनीने किसू सुद्धा शकता किंवा हाताने चांगले मॅश करु शकता. आता या मॅश केलेले पनीर एका बाऊलमध्ये घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा टाका. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हिरवा कांदा सुद्धा एकदम बारीक चिरून वापरू शकता. आता यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि बारीक चिरलेले आले घाला. तसेच ठेचलेली काळी मिरी, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स मिक्स करा. आता त्यात मीठ आणि तांदळाचे पीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात बेसन आणि कॉर्न फ्लोअरही घाला. बेसन तुमचे हे संपूर्ण मिश्रण बांधण्यास मदत करते आणि तांदळाचे पीठ कुरकुरीतपणा देतो. त्यामुळे हे पीठ स्किप करून का. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात थोडासा चाट मसाला आणि गरम मसाला देखील घालू शकता. आता हे सर्व नीट मिक्स करा.
आता याचे छोटासा गोळा घेऊन बॉल बनवा. आता एका कढईत तेल गरम करा आणि हे सर्व पनीर बॉल्स सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर तळा. तुमचे क्रिस्पी पनीर बॉल्स तयार आहेत. गरमा गरम सर्व्ह करा.