Crispy Chakli Recipe: दिवाळी म्हटलं की दिव्यांची आराससोबत फराळांच्या नानाविध व्यंजनांची मेजवानी असते. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी घरोघरी फराळाचे विविध प्रकार बनवले जात आहे. या फराळामध्ये सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चकली. पण अनेक वेळा प्रमाण बिघडल्याने चकल्या नीट होत नाही अशी तक्रार अनेक महिला करतात. तुम्हाला खुसखुशीत चकल्या बनवायच्या असतील तर तुम्ही शेफ तरला दलालची ही रेसिपी ट्राय करू शकता. विशेष म्हणजे ही चकली खूप कमी वेळेत तयार होते. यंदाच्या दिवाळीत शेफ स्टाईलने क्रिस्पी चकल्या बनवा आणि सणाचा आस्वाद घ्या.
- १ कप तांदळाचे पीठ
- १ टेबलस्पून बटर
- १/२ टीस्पून जिरे
- १/२ टीस्पून काळे तीळ
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
तांदळाची इंस्टंट चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम एका खोल पॅनमध्ये १ कप पाणी उकळवा. पाण्यात उकळी आली की त्यात बटर, जिरे, काळे तीळ आणि चवीनुसार मीठ घाला. आता त्यात तांदळाचे पीठ घाला. पीठ थोड्या थोड्या प्रमाणात घाला आणि सतत ढवळत राहा. हे पीठ मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवा. आता गॅस बंद करा आणि पॅन झाकून ठेवा. साधारण ५ मिनिटे हे पीठ बाजूला ठेवा. आता तयार केलेले मिश्रण एका मोठ्या ताटात काढून घ्या. ते थोडे मळून त्याचे मऊ पीठ तयार करा. चकली तयार करण्यापूर्वी साच्याला तेलाने किंवा थोड्याशा बटरने ग्रीस करून घ्या. आता पिठाचा एक भाग घ्या आणि चकलीच्या साच्यात ठेवा. चकलीचा साचा नीट बंद करुन तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या चकल्या तयार करून घ्या. तुम्ही लहान किंवा मोठ्या चकल्या तयार करू शकता.
आता एका खोल नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. चकल्या मध्यम आचेवर तळून घ्या. लक्षात ठेवा जोपर्यंत चकल्या सोनेरी तपकिरी रंगाचे आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होत नाही तोपर्यंत मध्यम आचेवर तळा. गॅसची फ्लेम जास्त ठेवू नका. आता चकल्या टिश्यू पेपर असलेल्या ताटात काढून घ्या. चकल्या थंड करा आणि हवाबंद डब्यात ठेवा.
संबंधित बातम्या