Chilli Coriander Masala Paratha Recipe: हिवाळ्यात सकाळी उठायला कंटाळा येतो. त्यातही वीकेंडची सुट्टी असेल तर आळस आणखी वाढतो. सकाळी उशिरा उठल्यानंतर आता नाश्त्यात काय बनवायचे हा प्रश्न पडला असेल तर हा टेस्टी नाश्ता झटपट तयार करा. हे बनवायला सोपे आहे आणि काही मिनिटात तयार होते. हा मसालेदार पराठा लहान मुलांसह मोठ्यांनाही खूप आवडेल. कोथिंबीर आणि मिरचीसोबत बनवलेला हा पराठा तुमचा दिवस खास बनवेल. चला तर जाणून घेऊया टेस्टी कोथिंबीर-मिरची पराठ्याची रेसिपी.
- १-२ कप गव्हाचे पीठ
- १ कप शिमला मिरची बारीक चिरून
- १ कप कोथिंबीर बारीक चिरून
- १ चमचा लाल तिखट किंवा ठेचलेली लाल मिरची
- चाट मसाला
- कलौंजी
- पांढरे तिळ
- देशी तूप किंवा बटर आवश्यकतेनुसार
- मीठ चवीनुसार
हे टेस्टी पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ मळून घ्या. पीठ सामान्य पराठे बनवण्यासाठी असते तसे असावे. शिमला मिरची बारीक चिरून एका बाउलमध्ये ठेवा. त्यात लाल मिरची आणि चाट मसाला एकत्र करा. आता हिरवी कोथिंबीर बारीक करून घ्यावी. तुम्हाला स्पायसी खायला आवडत असेल तर हिरव्या मिरच्या बारीक चिरून बाजूला ठेवा. आता मळलेले पीठ घ्या आणि गोल आकारात लाटून घ्या. यावर चांगल्या प्रकारे देशी तूप किंवा बटर लावून परत लाटून घ्या. पोळी लाटून झाल्यावर पूर्ण पोळीवर चमच्याच्या मदतीने तूप किंवा बटर लावा. आता या पोळीवर बारीक चिरलेली शिमला मिरची, कोथिंबीर, पांढरे तीळ, कलौंजी, घाला. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शिमला मिरची सोबत तुमच्या आवडीच्या इतर भाज्या देखील घालू शकता. आता हाताच्या मदतीने हा सर्व मसाला हलके दाबा, जेणेकरून सर्व भाज्या पराठ्याला चिकटतील. आता तवा गरम करा आणि तव्यावर सपाट बाजूने पराठा शिजवा.
पराठा एका बाजूने चांगले शिजले की हळू हळू पलटून घ्या. जेणेकरून भाजी इकडे तिकडे पडणार नाही. आता तूप किंवा लोणी लावून भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. तुमचा टेस्टी पराठा तयार आहे. चटणी, लोणचे, रायता सोबत गरमा गरम सर्व्ह करा.