Chilli Cheese Balls Recipe: संध्याकाळ लागणारी थोडीशी भूक मिटवण्यासाठी चहासोबत काहीतरी खाल्ले जाते. प्रत्येक वेळी चहासोबत टोस्ट, बिस्किट खायचा कंटाळा येतो. तुम्हाला सुद्धा चहासोबत काहीतरी चटपटीत खावेसे वाटत असेल तर तुम्ही चिली चीज बॉल्स बनवू शकता. ते बनवण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. तसेच चटपटीत, स्पायसी खाणाऱ्या लोकांना हे स्नॅक्स नक्कीच आवडेल. जाणून घ्या झटपट चिली चीज बॉल्स कसे बनवायचे.
- ७-८ जाड हिरव्या लोणच्याच्या मिरच्या
- अर्धा कप मैदा
- अर्धा कप कॉर्न फ्लोअर
- अर्धा कप मोझरेला चीज
- २ ते ३ चमचे क्रीम
- १ कप बारीक केलेले कॉर्न फ्लेक्स
- २ चमचे ठेचलेल्या लाल मिरच्या
- १ चमचा बारीक चिरलेले आले
- १ बारीक चिरलेली शिमला मिरची
- २ चमचे ओरेगॅनो
- मीठ चवीनुसार
- तळण्यासाठी तेल
हे स्नॅक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम हिरव्या मिरच्या ओल्या कपड्याने पुसून कोरड्या करा. नंतर या सर्व मिरच्यांचे देठ काढून घ्या. तसेच मिरचीला चीर मारुन आतील सर्व बिया आणि गर बाहेर काढा. आता एका भांड्यात मोझरेला चीज, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली सिमला मिरची, आले आणि कांदा एकत्र करा. त्यात मीठ आणि ओरेगॅनो घालून मिक्स करा. आता ही पेस्ट बिया काढलेल्या मिरच्यांमध्ये भरा. भरल्यानंतर या मिरच्या फ्रीजमध्ये ठेवा. जेणेकरून हे सेट होतील. १० ते १५ मिनिटांनंतर मिरच्या फ्रीजमधून काढा आणि लहान लहान आकाराचे तुकडे करा. आता जाडसर बॅटर तयार करण्यासाठी कॉर्न फ्लोअर आणि मैदा एकत्र करा. त्यात पाणी घालून घट्ट बॅटर तयार करा. दुसऱ्या प्लेटमध्ये कॉर्न फ्लेक्स बारीक करुन ठेवा.
आता चीज मिरची मैद्याच्या बॅटरमध्ये बुडवा आणि नंतर बारीक केलेल्या कॉर्न फ्लेक्समध्ये घाला. चांगले कोट झाल्यावर गरम तेलात टाकून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तुमचे चिली चीज बॉल्स तयार आहेत. गरमा गरम सर्व्ह करा.