मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Idli Chaat Recipe: नाश्त्यात बनवा चटपटीत इडली चाट, ही रेसिपी बनवेल तुमचा वीकेंड खास

Idli Chaat Recipe: नाश्त्यात बनवा चटपटीत इडली चाट, ही रेसिपी बनवेल तुमचा वीकेंड खास

Jul 06, 2024 10:41 AM IST

Weekend Breakfast Recipe: इडली खायला सर्वांनाच आवडते. पण नेहमीची इडली चटणी नाही तर यावेळी ट्राय करा चटपटीत इडली चाटची रेसिपी.

चटपटीत इडली चाटची रेसिपी
चटपटीत इडली चाटची रेसिपी (freepik)

Chatpati Idli Chaat Recipe: जर तुम्हाला नाश्त्यामध्ये साऊथ इंडियन फूड खायला आवडत असेल पण रोज तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही नवीन चटपटीत इडली चाट रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी तुमचा वीकेंड खास बनवेल. इडली चाट खाण्यास अतिशय चविष्ट तर आहेच पण आरोग्याच्या दृष्टीनेही एक हेल्दी रेसिपी आहे. या रेसिपीची विशेषता म्हणजे याची चव लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची चटपटीत इडली चाट.

इडली चाट तयार करण्यासाठी साहित्य

- रवा १ कप

ट्रेंडिंग न्यूज

- दही १ कप

- मोहरी १ टीस्पून

- हिरवी मिरची चिरलेली १

- कढीपत्ता ८-१०

- काजू १ टेबलस्पून

- बेकिंग पावडर १/४ टिस्पून

- तेल १ टीस्पून

- मीठ चवीनुसार

तडक्यासाठी

- चणा डाळ १ टीस्पून

- कढीपत्ता ८-१०

- मोहरी १ टीस्पून

- लाल तिखट १/२ टीस्पून

- हिरवी मिरची १

- तेल १ टीस्पून

- मीठ चवीनुसार

चाट तयार करण्यासाठी

- दही १ कप (जिरे, काळे मीठ आणि साखर टाकून चांगले फेटलेले)

- कांदा चिरलेला १ टेबलस्पून

- टोमॅटो चिरलेला १ टेबलस्पून

- हिरवी चटणी २ टेबलस्पून

- चिंचेची चटणी २ टेबलस्पून

- डाळिंबाचे दाणे १ टेबलस्पून

- शेव १ टेबलस्पून

चटपटीत इडली चाट बनवण्याची पद्धत

इडली चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम इडली बनवून घ्या. एका भांड्यात रवा आणि थोडे मीठ घालून चांगले मिक्स करा. रव्यात दही टाकल्यानंतर चांगले मिक्स करून मिश्रण अर्धा तास बाजूला ठेवा. आता एका कढईत १ चमचा तेल घालून त्यात मोहरी, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घाला. नंतर कढईत चिरलेले काजू घालून हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आता हे मिश्रण तयार इडलीच्या पिठात घालून चांगले मिक्स करा. यानंतर पिठात थोडे पाणी घालून इडलीसाठी परफेक्ट बॅटर तयार करून त्यात बेकिंग पावडर घाला. आता इडलीच्या साच्यात थोडे तेल लावून त्यात इडलीचे पीठ घालून १०-१५ मिनिटे शिजवा.

इडली तयार झाल्यावर साच्यातून इडली काढून एका बाऊलमध्ये ठेवा. इडली थोडी गरम असेल तेव्हा त्याचे तुकडे करा. आता एका कढईत १ टीस्पून तेल घालून त्यात मोहरी घाला. यानंतर चणा डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून सर्व थोडा वेळ परतून घ्या. आता त्यात चिरलेल्या इडलीचे तुकडे घालून चांगले मिक्स करा. थोड्या वेळाने गॅस बंद करून इडली एका बाऊलमध्ये काढून घ्या. आता या बाऊलमध्ये वरून दही मिक्स करून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी मिक्स करून पुन्हा दही घाला. शेवटी डाळिंबाचे दाणे आणि शेवने गार्निश करून चटपटीत इडली चाट सर्व्ह करा.

WhatsApp channel