Banarasi Tomato Chaat Recipe: होळीचा सण आनंद, उत्साहाने भरलेला असतो. रंगांच्या या सणाला अनेक जण घरी पार्टीचे आयोजन करतात. किंवा अनेकदा मित्र, नातेवाईक एकमेकांच्या घरी जातात. तुम्ही होळीसाठी काही पदार्थ बनवले असतील. पण तुम्हाला काहीतरी चटपटीत बनवायचे असेल तर तुम्ही बनारस स्पेशल टोमॅटो चाट बनवू शकता. हे बनवायला सोपे आहे आणि लवकर तयार होते. जाणून घ्या याची रेसिपी.
- ४ टोमॅटो बारीक चिरलेला
- १ बारीक चिरलेला कांदा
- २ उकडलेले बटाटे मॅश केलेले
- १ टेबलस्पून तेल
- १ इंच बारीक चिरलेले आले
- १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
- १ चमचा गरम मसाला
- १ चमचा जिरे पावडर
- १ चमचा लाल तिखट
- १ चमचा चाट मसाला
- १/२ टीस्पून काळे मीठ
- मीठ चवीनुसार
- १ चमचा लिंबाचा रस
- अर्धा कप पापडी
- अर्धा कप बारीक शेव
- थोडे कोथिंबीर
बनारस स्पेशल टोमॅटो चाट बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. नंतर त्यात कांदा, हिरवी मिरची आणि आले घालून चांगले परतून घ्या. कांदा मऊ झाल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करा. झाकण ठेवून साधारण ५ मिनिटे शिजवा. टोमॅटो काही वेळाने मऊ होतील. नंतर त्यात मॅश केलेले बटाटे घालून चांगले मिक्स करा. नंतर त्यात गरम मसाला, जिरेपूड, लाल तिखट, चाट मसाला, काळे मीठ आणि मीठ घाला. नीट मिक्स करून शिजू द्या. शिजल्यावर गॅस बंद करा. नंतर त्यात लिंबाचा रस घाला. आता बनारसी टोमॅटो चाट सजवण्यासाठी पापडी तोडून चाटवर ठेवा आणि नंतर शेव आणि कोथिंबीरीने सजवा. तुम्ही गार्निशिंगसाठी डाळिंबाचे दाणे देखील वापरू शकता.