Benefits of Neem Oil For Hair: हवामान बदलाचा पहिला परिणाम केसांवर दिसू लागतो. बदलत्या ऋतूत केसांची नीट काळजी घेतली नाही तर केस गळणे, कोंडा आणि स्प्लीट एंड यांची समस्या सतावू लागते. तुम्हालाही पावसाळ्यात केस निरोगी ठेवायचे असतील तर कडुलिंबाच्या तेलाचा वापर सुरू करा. कडुलिंबाच्या तेलात फॅटी अॅसिड, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. जे टाळूच्या समस्येपासून मुक्ती देण्यासोबतच एक्झामा आणि सोरायसिसपासून मुक्त होण्यास मदत करतात. आयुर्वेदात केसांचे आरोग्य राखण्यासाठी कडुलिंबाचे तेल वापरण्याची शिफारस केली आहे. अशा परिस्थितीत कडुलिंबाचे तेल कसे बनवावे आणि केसांना कसे लावावे तसचे केसांसाठी कडुलिंबाच्या तेलाचे फायदे जाणून घेऊया.
कडुलिंबाच्या तेलात अँटीफंगल गुणधर्म असतात, जे टाळूवर बुरशी जमा झाल्यामुळे होणारा कोंडा दूर करण्यास मदत करतात.
कडुलिंबाचे तेल केसांची छिद्रे मजबूत करून केस गळण्याची समस्या कमी करते. यामध्ये असलेले पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना पोषण देतात आणि त्यांना मजबूत बनवतात.
कडुलिंबाचे तेल केसांच्या मुळांना पोषण देते आणि डोक्याचे रक्ताभिसरण वाढवते. ज्यामुळे हेअर ग्रोथमध्ये वेग येतो. कडुनिंबाचे तेल नियमित लावल्यास केस दाट आणि लांब होऊ शकतात.
पावसाळ्यात अनेकदा लोकांना टाळूला खाज सुटण्याची समस्या उद्भवू लागते. हे टाळण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा वापर करता येतो. कडुलिंबाच्या तेलात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे टाळूमध्ये कवच तयार झाल्यामुळे होणारी खाज सुटण्यास मदत होते. कडुलिंबाचे तेल हलके गरम करून त्यात कापूर मिसळून टाळूला मसाज करा. यामुळे टाळूमध्ये खाज सुटणे आणि इन्फेक्शनची समस्या दूर होईल.
कडुलिंबाच्या तेलात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचवतात.
कडुलिंबाचे तेल बनविण्यासाठी प्रथम कडुलिंबाची पाने नीट धुवून बारीक करून घ्यावीत. त्यानंतर ही पेस्ट खोबरेल तेलात उकळून तेल तयार करावे.
कडुलिंबाचे तेल हलके गरम करून बोटांच्या साहाय्याने टाळूवर लावून कमीत कमी ३० मिनिटे मसाज करा. त्यानंतर कडुलिंबाचे तेल डोक्यावर तासभर ठेवावे. तासाभरानंतर केसांना शॅम्पू करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)